‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन; पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचाही केला शुभारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 8 : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या रायगड : पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचाही शुभारंभ करण्यात आला.


मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.


श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई- पुस्तक महाजालावर www.raigadtourism.com येथे तसेच मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.raigad.nic.in येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर मोबाईल ॲपमध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदींबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे.


या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे,  समुद्र किनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा