शहीदांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये, दोन हेक्टर जमीन, शौर्य-सेवा पदक धारकांच्या अनुदानात दुपटीने वाढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अँण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स कार्यक्रमात शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानमुंबई, दि. 31 :- भारतीय सैन्याने देशाची मान आपल्या शौर्याने जगात गौरवाने उंचावली आहे. यात शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे, अशा शब्दात भारतीय सैन्य दलाचा गौरव करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्यासह महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केल्याचे जाहीर केले.

अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वन फॉर ऑल ॲण्ड ऑल फॉर वन उपक्रमांतर्गत आयोजित अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अँण्ड सॅल्यूट टू सोल्जर्सया कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, आमदार आशिष शेलार, निवृत्त मेजर जनरल राज सिन्हा, महावीर चक्र विजेते विंग कमांडर जगमोहन नाथ, विंग कमांडर एस. एम. अहलुवालिया, ग्रुप कॅप्टन एस. एम. आव्हाळे, मेजर जनरल आर. के. सुदान, परमचक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव, ब्रिगेडियर वसंत पाटील, कार्यक्रमाचे संयोजक फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल राणे, सौ. वर्षा राणे, कर्नल सुधीर राजे, कर्नल एस. के. चौधरी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.वरळीस्थित एनएससीआय डोममध्ये झालेल्या कार्यक्रमात शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संपूर्ण सभागृहाने उभे राहून वीरांना मानवंदना दिली, तसेच 'भारत माता की जय' च्या घोषणांचा गजर केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहीद वीरांच्या कुटुंबियांच्या त्यागाला वंदन करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. हा केवळ त्यांचा सन्मान नव्हे, तर देशाचाही सन्मान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान चोवीस तास सज्ज असतात. वेळ आल्यास हे जवान आपल्या प्राणाचीही आहुती देतात. त्यामुळे अशा जवानांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर भारतीय सेना कार्यरत आहे. केवळ मातृभूमीसाठी समर्पण हेच आपले जीवन मानले आहे. भारतानेही केवळ वीरता आणि त्यागाचीच पूजा केली आहे. वीर जवानांच्या हौतात्म्याचे मोल करता येणार नाही. पण या कुटुंबियांसाठी योगदान देणे हे कर्तव्यच मानावे लागेल. याच कृतज्ञतेपोटी शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहीदांच्या कुटुंबियांना त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. याशिवाय शौर्य पदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकद्वारे आपले शौर्य दाखवून दिले आहे. तसेच डोकलाम मध्ये जाऊन चिनी सैन्यालाही आपली ताकद दाखविली आहे. सेना दलाने भारताची जगभरातील प्रतिमा आपल्या शौर्याने आणखी उंचावली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शहीद वीरांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अनुदान तसेच शौर्य आणि सेवापदक धारकांच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयाचे सभागृहातील उपस्थितांनी 'भारत माता की जय'च्या घोषणांनी स्वागत केले.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, आपल्या तिन्ही सेना दलातील सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी सज्ज राहतात. प्रसंग आल्यास हौतात्म्यही पत्करतात. त्यामुळे शहीदांच्या कुटुंबियांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अंतर्गत नक्षलवाद असो, की सीमेवरील लढाई असो या सैनिकांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्यामुळेच भारताची अखंडता आणि एकात्मता अबाधित आहे. लोकशाहीला आव्हान देणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अविरतपणे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सामाजिक आर्थिक विकासाच्या पर्यायांचाही अवलंब केला जातो. स्वराज्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग केला आहे. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. आता या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने या शूरांच्या त्यागाप्रती कृतज्ञ रहावे लागेल. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागालाही अभिवादन करावे लागेल. असे कार्यक्रम नव्या पिढीसाठी राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील.


मेजर जनरल सिन्हा यांनी सेना दल आणि सामान्य नागरिकांदरम्यान सुसंवाद साधण्यासाठीच्या अशा उपक्रमांचे स्वागत केले.

फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विविध सामाजिक, राजकीय, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र गौरव पुरस्कार

अ.क्र.
शौर्यपदक पुरस्कार
सध्या दिली जाणारी एकूण रक्कम 2017-18 (रुपये)
अनुदानाची सुधारित रक्कम (रुपये)

शौर्यपदकाचे नाव


1
परमवीर चक्र
30 लाख
60 लाख
2
अशोक चक्र
30 लाख
60 लाख
3
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक
18 लाख
36 लाख
4
महावीर चक्र
18 लाख
36 लाख
5
किर्ती चक्र
18 लाख
36 लाख
6
उत्तम युद्ध सेवा पदक
12 लाख
24 लाख
7
वीर चक्र
12 लाख
24 लाख
8
शौर्य चक्र
12 लाख
24 लाख
9
युद्ध सेवा पदक
12 लाख
24 लाख
10
सेना/नौसेना/वायु सेना पदक
6 लाख
12 लाख
11
मेन्शन इन डिस्पॅच
3 लाख
6 लाख

सेवापदकाचे नाव


12
परम विशिष्ट सेवा पदक
2.04 लाख
4 लाख
13
अति-विशिष्ट सेवा पदक
1.03 लाख
2 लाख
14
सेना/नौसेना/वायु सेना पदक
0
1.50 लाख
15
विशिष्ट सेवा पदक
40 हजार
1 लाख
16
मेन्शन इन डिस्पॅच
0
50 हजार
मरणोत्तर शौर्यपदक धारकांवर अवलंबून असणाऱ्या विधवा/अवलंबिताना
सुधारित दरानुसार मासिक अनुदान
अ.क्र.
शौर्यपदक पुरस्कार
सन 2017-18 मध्ये दिले जाणारे मासिक अनुदान (रुपये)
अनुदानाची सुधारित रक्कम (रुपये)

शौर्यपदकाचे नाव


     1
परमवीर चक्र
16,500
33,000
   2
अशोक चक्र
13,200
26,500
   3.  
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक
12,540
25,000
   4.                        
महावीर चक्र
12,540
25,000
   5.                         
किर्ती चक्र
9,900
20,000
   6.  
उत्तम युद्ध सेवा पदक
8,580
17,000
   7.                        
वीर चक्र
7,260
14,500
   8. 
शौर्य चक्र
4,620
9,000
   9.  
युद्ध सेवा पदक
3,960
8,000
   10.                    
सेना/नौसेना/वायु सेना पदक
2,640
5,500
   11.                     
मेन्शन इन डिस्पॅच
1,320
2,500
    12.                    
व्हिक्टोरिया क्रॉस
13,200
26,500

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुरजकुंड मेळ्याचे’ उद्या उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम यांच्यासह राज्याच्या संस्कृतीचे होणार दर्शन

नवी दिल्ली, दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे आयोजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचेउद्या, 1 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राला या मेळ्याच्या थीम स्टेटचा मान मिळाला असून, महाराष्ट्रातील गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम तसेच महाराष्ट्राचे सण-उत्सव व गौरवशाली परपंरा दर्शविणारे विविध देखावे आणि रेखाचित्रांनी सुरजकुंड सज्ज झाले आहे. या मेळ्यात राज्याची हस्तकला, खाद्यपदार्थ व लोकसंस्कृती बघायला मिळणार आहे.


सुरजकुंड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन यांनी मेळ्याच्या उद्घाटनाबाबत व संपूर्ण सज्जतेबाबत माहिती दिली .केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी , महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यावेळी उपस्थित होते.यावेळी विजय वर्धन यांनी सांगितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटनमंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन टॉर्न गांटा यावेळी उपस्थित राहतील.


सुरजकुंड मेळ्यात अवतरला महाराष्ट्र
या मेळ्याचे मुख्य कार्यक्रम स्थळ असणाऱ्या चौपाल रंगमंचाला ऐतिहासिक रायगड किल्ल्याचे स्वरुप देण्यात आले आहे. येथेच उभारण्यात आलेल्या मातीच्या छोट्या-छोट्या घरांवर हत्तीवर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज तसेच गडावर लढणारे शूर मावळे चित्ररुपाने दर्शविण्यात आले आहेत. शेजारीच मराठमोळी गुढी उभारण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असणारा आकाशकंदील या मेळ्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मेळ्याच्या मुख्यद्वाराच्या कडेलाच राज्यातील गड किल्ले यांच्या मोठमोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई शेजारील जगप्रसिद्ध एलिफंटा गुंफेतील त्रिमूर्ती ही आकर्षकरित्या सजविण्यात आली आहे. महाराष्ट्राची समृद्ध लोककलाही या मेळ्यात ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. वासुदेवाच्या वेशातील कलाकार या मेळ्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना जनजागृती पर संदेश देण्यास सज्ज झाले आहेत. तसेच या मेळ्यात सांस्कृतिक कार्यकम व मनोरंजानासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कट्टयावर महाराष्ट्रातील कलाकार भारूड, लावणी आदी लोककलाही सादर करणार आहेत.महाराष्ट्राने केले देशाचे संरक्षण - विजय वर्धन
यावर्षीच्या सुरजकुंड मेळ्याची थीम स्टेट असणारे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून इतिहासात देशाच्या संरक्षणासाठी या राज्याने घेतलेला पुढाकार चिरस्मरणीय आहे. भारत देशाच्या संरक्षणासाठी दोन लाख मराठा सैनिक हजारो मैल हरियाणातील पानिपत येथे अहमदशाह अब्दालीचा सामना करण्यासाठी आले होते. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मात्र देश संरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान अनन्यसाधारण असल्याचे विजय वर्धन यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर दक्षिण हरियाणात मराठ्यांचे राज्य होते.  हा गौरवशाली इतिहास असलेला महाराष्ट्र 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे थीम स्टेट आहे. सतरा दिवस चालणा-या या मेळ्यात महाराष्ट्राची हस्तकला, खाद्यपदार्थ आणि वैविध्यपूर्ण संस्कृती देश व जगातील पर्यटकांना अनुभवायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देश व जगात पोहोचेल :विनिता सिंगल
या मेळ्यात महाराष्ट्राचे 75 स्टॉल्स उभारण्यात आले असून सर्वोत्तम 100 हस्तकलाकार विविध हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवणार आहेत. राज्यातील 100 कलावंतांचा चमू येथे दाखल झाला असून हे कलाकार महाराष्ट्राची वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण व मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थही याठिकाणी येणाऱ्यांना चाखायला मिळणार आहेत. या मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती व पर्यटन स्थळे देश व जगात पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मेळ्यात मुख्य चौपालावर दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्राला महत्त्वाचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा देण्यात आली आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशासह शिवाजी महाराजांचा गनिमी कावासांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. 79 फेब्रुवारी रोजीही महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय या सर्व कार्यक्रमाचे संयोजन व समन्वय करणार आहे.
सुरजकुंड मेळा प्राधिकरण व हरियाणा राज्य पर्यटन विभाग, केंद्र शासनाचा पर्यटन विभाग, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 17 फेब्रुवारी 2019 दरम्यान 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश तसेच एकूण 30 देश या मेळ्यात सहभागी होत आहेत. या मेळ्यात थायलंडला सहयोगी देशाचा मान मिळाला आहे.

बलशाली भारताच्या संकल्पनेत ‘नो युवर आर्मी’ उपक्रम महत्त्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

बीकेसी येथे वीर सेनानी व स्वरनिनाद फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय सुरक्षा परिसंवाद व आर्म्ड फोर्सेस प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 31 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बलशाली भारताची संकल्पना साकारण्यात ‘नो युवर आर्मी’(Know Your Army) सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे वीर सेनानी व स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सुरक्षा परिसंवाद व आर्म फोर्सेस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे कर्नल विक्रम पत्की, डॉ. भरत बलवली, महाराष्ट्र राज्य सुरक्षा आयजीपी कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सैन्यदलाबद्दल प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे. आपले सैन्य दल देशाला सुरक्षित ठेवते. देशाच्या प्रगतीच्या पाठीशी भारताचे बलशाली सैन्यदल आहे. त्यांना नागरिकांचा योग्य पाठिंबा मिळाला तर देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल. सैन्य दलाची माहिती युवा वर्गात अधिक सक्षमतेने पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम, परिसंवाद उपयुक्त ठरतात. सैन्य दल आणि जनता यांच्यामध्ये वीर सेनानी व स्वरनिनाद फाऊंडेशनसारख्या संस्था सेतूचे काम करतात त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी फाऊंडेशनचे अभिनंदन केले. तसेच युवा वर्ग व नागरिकांनी अशा प्रकारच्या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होऊन सैन्य दलाबद्दल आपला आदर व्यक्त करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केलेयावेळी कृष्णप्रकाश, डॉ. भरत बलवली यांचीही भाषणे झाली. कर्नल पत्की यांनी या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती प्रास्ताविकातून दिली व अशा उपक्रमास सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


आजपासून 3 फेब्रुवारीपर्यंत चार दिवस आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षेबाबत चर्चासत्रे व आर्म्ड फोर्सेस प्रदर्शन खुले आहे. या कार्यक्रमास माजी सैनिक, नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यातील उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरवठ्याचा शासन निर्णय लागू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मार्च 2020 पर्यंत 1 रुपये 16 पैसे प्रति युनिट दराने वीज पुरवठामुंबई, दि. 31 : राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रती युनिट 1 रुपया 16 पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसातच आज राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने तातडीने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने 1 नोव्हेंबर 2016 पासून मार्च 2020 पर्यंत हा वीजदर लागू राहणार आहे. या निर्णयाचा फायदा अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे.


नदीपासून 50 मीटर ते 200 मीटर उंचीपर्यंत 2 ते 5 टप्प्यात पाणी पोहोचविण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्थांची स्थापना करून उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठीच्या वीज दर वाढीमुळे या सहकारी संस्थांना तसेच त्यामधील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. तसेच योजनांची कार्यक्षमता आणि शेती उत्पादनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने याची दखल घेऊन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीज दर लागू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी 29 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय त्वरित काढून हा दर लागू करण्यासाठी श्री. पाटील यांनी ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ऊर्जा विभागाने दोन दिवसात कार्यवाही करून आज यासंबंधीचा शासन निर्णय जारी करून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या दरामुळे महावितरणवर पडणाऱ्या आर्थिक भाराच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला शासनाकडून 107 कोटी 73 लाख रूपये देण्यात येणार आहेत.
००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/31.1.19