खेळामुळे संघभावना वाढीस लागते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

सीएम चषक स्पर्धेत राज्यभर २४ लाख खेळाडूंची नोंदणी
  



नागपूर : आज शाळकरी वयातील मुले व तरूणाई मोबाईल व संगणकावरील खेळ खेळतात. त्यांनी  शारीरिक खेळ खेळण्यासाठी मैदानावर यावे या उद्देशाने सीएम चषक या देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या स्पर्धेसाठी  २४ लाख खेळाडूंची नोंदणी झाली आहे. याच गतीने स्पर्धेसाठी नोंदणी होत गेल्यास लवकरच याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.


दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात प्रतापनगर येथील क्रीडांगणात आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महापौर नंदा जिचकार, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, रमेश भंडारी, शिवानी दाणी, स्पर्धेच्या संयोजिका राणी द्विवेदी, सारंग कदम उपस्थित  होते.


खेळ व सांस्कृतिक क्षेत्रात तरूणाई रमते. नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते, संघ भावना वाढीस लागते. आयुष्यातील यश-अपयशाकडे खिलाडूवृत्तीने पाहण्याचा दृष्टीकोन तयार होतो. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुणांनी सुदृढ राहण्यासाठी खेळले पाहिजे. मंदिरापेक्षा मैदानात जावे, असे स्वामी विवेकानंद सांगून गेले. स्वामी विवेकानंदांचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून  तरूणाईपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सीएम चषक या स्पर्धेसाठी दक्षिण-पश्चिम नागपूर क्षेत्रातून पाच हजार खेळाडूंनी नोंदणी केली ती पंधरा हजारापर्यंत होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल, तिरळे कुणबी समाजाला समाजभवन व सिंधी समाजाला मालकी हक्काचे पट्टे दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा विविध संस्थांनी सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा