कॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्ससोबत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे उद्घाटन



अकोला, दि. 3 : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्ससोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.


बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाच्या कॅन्सर केअर हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री (शहरे) तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पिटलच्या अध्यक्ष श्रीमती टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती.




कुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे गरजेचे असते. राज्य शासन महात्मा फुले जनआरोग्य अभियान व केंद्र सरकारच्‍या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य करते.

मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. या कर्करोगाच्या प्रकारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती  होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहीम राबविली. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे. कुठलेही काम समर्पित भावनेने केल्यास ते निश्चितच फळाला येते हे येथे दिसून येते.



प्रास्ताविकात टिना अंबानी म्हणाल्या, रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पीडित रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदिया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी महापौर विजय अग्रवाल, आमदार बळीराम सिरस्कार, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा