आईने मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज - मातृत्वाचा संदेश देण्यासाठी २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार मातांचे मत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली, दि. ६ :  मुलांना घडविण्यात आईची भूमिका अनन्यसाधारण असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतासह परदेशातही मातांकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचे चित्र आहे. म्हणून प्रत्येक मातेने आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज असल्याच्या भावना मातृत्वाचा संदेश देण्यासाठी २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार भारतीय मातांनी आज येथे व्यक्त केल्या.

            

फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन ॲकॅडमिक
 फिल्डया संस्थेच्या वतीने 'मुलांना घडविण्यात मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्व' हा संदेश देण्यासाठी चार मातांनी मदर्स ऑन व्हिल्सहा २२ देशांतील प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आज या प्रवासाविषयी माहिती देण्यासाठी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या वतीने आझादभवन या परिषदेच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'मदर्स ऑन व्हिल्सउपक्रमातील माता माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी या मातांनी आपल्या ६० दिवसांच्या विविध देशांच्या प्रवासातील अनुभवावर आधारित अहवालातील काही मुद्दे मांडले. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महासंचालक रिवा गांगुली दास आणि वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

महिला सर्वत्र समदु:खी

बहुतेक महिलांना घराचा गाडा चालविण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेर जावे लागते. त्यामुळे तिच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्याचा परिणाम मुलांच्या संगोपनावर होतो. या महिला आपल्या पाल्यांना गुणात्मक वेळ देऊ शकत नाहीत त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व व्यक्तिमत्वावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याचे माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

भारतीय महिलांप्रमाणे अन्य देशांतील महिलाही कामाचा ताण, पुरुषप्रधान संस्कृतीतील घुसमट, एकल मातांचे प्रश्न आदी समस्यांचा सामना करीत असल्याचे  चित्र समोर आले. या मिशनच्या माध्यमातून आम्ही  २२ देशांतील ६१२ कुटुंबांशी संवाद साधला. यातून आमच्यासमोर या देशांमधील महिलाही भारतातील महिलांप्रमाणेच विविध समस्यांचा सामना करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
सोव्हिएत संघातील देशांमध्ये एकल मातांचा प्रश्न प्रकर्षाने दिसून आला. याठिकाणी वरिष्ठ नागरिकांशी झालेल्या चर्चेतून त्यांनी आम्हाला या समस्येवर उपाययोजना सुचविण्याची विनंती केल्याचे मदर्स ऑन व्हिल्समिशनच्या अन्य सदस्य शीतल वैद्य-देशपांडे यांनी सांगितले. परदेशांमध्ये कुटुंबसंस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे. सुदैवाने भारतातील कुटुंबव्यवस्था बळकट असून जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे हे बलस्थान असल्याचेही या मातांनी यावेळी सांगितले. पुरुषप्रधान संस्कृती आणि त्यात महिलांची होणारी घुसमट, परस्पर संबंधातील दुरावे, कौटुंबिक समस्या आदी विषयांवरही या मातांनी जग प्रवासात केलेले अवलोकन यावेळी मांडले.  

असा झाला प्रवास

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी  १० सप्टेंबर २०१८ रोजी कोल्हापूर येथील मदर्स ऑन व्हिल्सउपक्रमाला झेंडा दाखवून सुरुवात केली. ९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सलग ६० दिवसांमध्ये या मातांनी २२ देशांतील ४७  शहरांमधून प्रवास केला. २३ हजार ६०० किलोमीटरच्या प्रवासात या मातांनी ६१२ कुटुंबांशी संवाद साधला. विविध देशांतील ३६ संस्थांना भेट दिली व या प्रवासात मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्त्व  या विषयांचा प्रचार व प्रसारासाठी एकूण ३४  कार्यक्रमांचे आयोजनही केले. 

चार मातांचा विश्वविक्रम

या मोहिमेत पुणे येथील शीतल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी, ग्वाल्हेरच्या माधवी सिंग व मूळच्या सांगलीच्या व सध्या दिल्लीस्थित असलेल्या माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी धाडसी सहभाग घेतला. मध्य आशिया आणि युरोपमधून जाणाऱ्या सिल्क रूटहून प्रवास करणाऱ्या आम्ही जगातील पहिल्या चार महिला ठरल्या आहोत, अशी माहिती शीतल वैद्य-देशपांडे यांनी दिली. सिल्क रूटहून महिलांच्या समूहाने असा एक संदेश घेऊन स्वत: कार चालवत प्रवास करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याने हा विश्वविक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.चार महिलांनी एकत्र येत मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्त्व  या विषयांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या 'मदर्स ऑन व्हिल्स' या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा