देश, राज्याच्या विकासात मुंबईचा विकास आराखडा महत्त्वपूर्ण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या परिसंवादात विविध घटकांशी संवाद
मुंबई, दि. ५ : - मुंबईचा विकास आराखडा हा सर्वसामान्य ग्राहक, राज्य आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल- नॅारडेकोच्या परिसंवादात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव डी. के. जैन, गृहनिर्माण व नगर विकास विभागाचे केंद्रीय सचिव दुर्गा मिश्रा, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नॅारडेकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, नॉरडेको महाराष्ट्राचे अध्यक्ष राजन बांदेलकर, एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव नारायणी आदींची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईचा विकास आराखडा अनेक घटकांना विश्वासात घेऊन तयार झाला आहे. अनेकांनी त्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अनेकांच्या सूचना, म्हणणे ऐकून घेऊन हा आराखडा तयार केल्याने, त्याबाबत विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच हा आराखडा पारदर्शक रितीने मानला जातो. त्याबाबत अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे. हा आराखडा मुंबईच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा मानता येईल. यात विविध संस्था, संघटनांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा  विकास आराखडा ग्राहक, राज्य आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने राबविण्यात योगदान देऊ या, असे आवाहन त्यांनी केले.


मुंबईने गेल्या तीन वर्षात जागतिक स्तरावर विकास क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. त्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निश्चितच कौतुक करतील, पण त्याचवेळी ते आणखी मोठे उद्दिष्टही आपल्यासाठी देतील. हे उद्दिष्टही आपण सामूहिक प्रयत्नातून निश्चितच साध्य करू, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आयडेक या आगामी प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच मुंबई विकास आराखड्यावरील अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.

या परिसंवादासाठी बांधकाम तसेच बँकिंग आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा