शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग वाढवावेत - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

एससी-एसटी उद्योजक विकास परिषदेचे उद्घाटन

मुंबई, दि. 3 : लघु उद्योजकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन उद्योग वाढवावेत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित एससी-एसटी उद्योजक विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.


उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या विकासासाठी शासनाच्या खरेदी धोरणात 4 टक्के आरक्षण व प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची नॅशनल एससी-एसटी हब (एनएसएसएच) अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाच्या उद्योग विभागामार्फत एनएसएसएच अंतर्गत असलेले अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांच्या 4 टक्के सहभाग राहण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी चर्चासत्रे, परिषदा, प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या सहकार्याने तीन दिवसीय उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
लघु उद्योग विकासासाठी शासन सर्वतोपरी कृतीशिल असून, लघु उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधा, बाजारपेठ, भांडवल उभारणी व आर्थिक सहाय्य इतर सर्व बाबी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या शासकीय योजनांचा सर्व लघु उद्योगांनी लाभ घेऊन आपला उद्योग व्यवसाय वाढवावा, असे श्री. देसाई म्हणाले.


केंद्र सरकारच्या सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव श्रीमती अलका अरोरा यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सिंगल पॉईंट रजिस्ट्रेशन, सीएलसीसी योजनेंतर्गत उच्च तंत्रज्ञान मशिनरीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान, क्रेडिट रेटींगसाठी आर्थिक सहाय्य तसेच लघु उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत अनुदानाच्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत.उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई म्हणाले, कष्ट, चिकाटी, मेहनत, नाविन्यपूर्ण कल्पना यातूनच उद्योग लहानातून मोठा होतो, शून्यातून सुरु केलेला प्रवास दीर्घकाळ टिकणारा असतो. याची अनेक उदाहरणे आपल्या देशात तसेच राज्यात बघावयास मिळतात. लघु उद्योजक, स्टार्ट अप उद्योगांनी मोठी झेप घ्यावी. शासनाचा उद्योग विभाग तुमच्या पाठीशी आहे. लघु उद्योजकासाठी क्लस्टर योजना अधिक प्रभावी राबविणार असल्याचे नमूद करुन शासनाच्या योजनांचा व संधीचा लाभ घेऊन लघु उद्योगांनी आपला व्यवसाय उद्योग मोठा करावा.


प्रारंभी प्रास्ताविकात उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, या परिषदेत एसएसी-एसटी प्रवर्गात उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्योजकांच्या क्षमतावृद्धीसाठी नामांकित संस्था केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम उद्योजकांचे मार्गदर्शन होणार आहे. शासनाच्या खरेदी प्रक्रियेत एसएसी-एसटी उद्योगकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्याच्या सार्वजनिक उपक्रमाद्वारे मदत देण्यात येणार आहे. परिषदेसाठी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून, राज्यातील 600 उद्योजक सहभागी झालेले आहेत.  परिषदेमध्ये विविध विषयावरील मार्गदर्शन, अभियांत्रिकी, बंदरे व शिपिंग, बांधकाम क्षेत्रातील संधी, राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील संधी, तेल, इंधन व रसायन क्षेत्रातील खेरदीच्या संधीबाबतची चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. तसेच याठिकाणी व्यावसायिक ते व्यावसायिक, व्यावसायिक ते ग्राहक बैठकांचे आयोजन केलेले आहे. त्याचा लाभ राज्यातील उद्योजकांना होत आहे.


सुमारे 150 उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आयोजित केलेले असून, त्यांना विविध सार्वजनिक उपक्रम/कंपन्या यांच्याकडे पुरवठ्याबाबतच्या संधी उपलब्ध होत आहेत. एन.एस.आय.सी., कोकण रेल्वे, पश्चिम व मध्य रेल्वे, आयआरसीटीसी, भेल, माझगाव डॉक, महाजेनको, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एचपीसीएल, ओएनजीसी, आरसीएफ, एमटीडीसी, एचएएल, डीआरडीओ, ॲम्युनिशन फॅक्टरी हे नामांकित सार्वजनिक उपक्रम परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे टाटा मोटर्स, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, फियाट, शिंडलर, टाटाकमिन्स, हेअर, बडवे इंजिनिअरींग इ. खासगी क्षेत्रातील मोठे उद्योगदेखील सहभागी आहेत.


याच कार्यक्रमात उद्योजिका पद्मश्री श्रीमती कल्पना सरोज, स्टील मॉन्टचे चेअरमन एन. राम, ब्लू स्टार लि.चे बी. त्यागराजन यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी केले. या उद्घाटनप्रसंगी एमआयडीसीचे सीईओ  पी. अन्बल्गन तसेच मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा