राज्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील बनविण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना - विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 3 : उच्च शिक्षणामधील सर्व विषयांमध्ये स्वायत्तता वाढविण्यासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या राज्याला अधिक प्रगतशील बनविण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना अंमलात आणण्याचे विचारात असल्याचे उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीने आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात राज्यातील विविध शैक्षणिक संस्था, विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांच्यासाठी महाराष्ट्रातील उच्च शिक्षणामधील अभ्यासक्रमाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)च्या प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.


श्री. तावडे म्हणाले, उच्च शिक्षणातील संबंधित विद्याशाखेची पदवी प्राप्त करताना विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील रोजगाराची हमी देणे गरजेचे आहे. यासाठी नवनवीन कौशल्य अंगीकृत करण्याची गरज आहे. संस्थाचालक व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अभ्यासक्रम व उद्योजकांना लागणाऱ्या कौशल्याची सांगड घालून आराखडा तयार करावा.यावेळी राष्ट्रीय भारतीय प्रशासकीय सेवा च्या प्रधान सचिव व उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)च्या प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन यांनी उपस्थित संस्थाचालक व इतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्य आणि सर्वांगीण कौशल्यपूर्ण विकासासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण हेरून 'रुसा'ने प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमांचा उच्च शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी आवाहन केले.


यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ.जी. डी. यादव,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, व्हीजेटीआय मुंबईचे संचालक धीरेन पटेल, आयआयटी मुंबईचे लोहित पेनुबाकू यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा