उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  





नवी दिल्ली, दि. ३ : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील दिव्यांगांना   दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आज जागतिक अपंग दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार २०१८’ प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते  विविध १४ श्रेणींमध्ये महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांसह देशातील एकूण ५६ व्यक्ती व १६ संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, विजय सांपला आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला गामलिंग यावेळी उपस्थित होत्या.




राज्यातील चार दिव्यांगांचा सन्मान             
नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे  यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार, पुणे येथील चार्टर्ड अकाऊंटंट भूषण तोष्णीवाल यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार, नाशिक येथील स्वयं पाटील याला सृजनशील बालकाचा पुरस्कार तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला


कांचनमाला पांडे यांनी १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले . अंधांच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी  १०० हून अधिक सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दहावी व बारावीमध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्या बँकिंगची तयारी करीत होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या ३ वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहेत. मेक्सिको येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत कांचनमाला यांनी भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते व या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या  त्या भारताच्या पहिल्या जलतरणपटू ठरल्या.





नाशिकचा स्वयं पाटील यास सृजनशील दिव्यांग बालकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटील च्या हृदयाला छिद्र झाले. यातून बरा होत नाही तर त्याच्यावर कानाशी संबंधित तीन शस्त्रक्रिया झाल्या. यातही त्याच्या आई -वडिलांनी खचून न जाता त्याला धीर देत सांभाळ केला. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिर येथे आता स्वयं सामान्य मुलांच्या शाळेत ५ व्या वर्गात शिकतो. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करून जलतरणात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्थापित केला आहे. अपंगत्वावर मात करून स्वयं सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेत आहे, तो उत्तम नृत्य करतो व विविध नृत्य स्पर्धांमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आहेत. स्वयंच्या याच अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सृजनशील बालकाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात आला.                        





पुणे येथील पिंपरी-चिंचवड भागात राहणारे भूषण तोष्णीवाल यांनी दृष्टीहीनतेवर मात करून आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप सोडली आहे, त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी रोल मॉडेलठरले आहे. आज रोल मॉडेलचा बहुमान त्यांना मिळाला. स्वत:च्या आयुष्यातील संघर्षातून इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे भूषण हे उत्तम प्रेरणादायी वक्ते आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह जयपूर, जोधपूर, बंगलुरु, कोलकाता आदी ठिकाणी ४०० च्या वर प्रेरणादायी विचारांचे कार्यक्रम केले आहेत. सध्या पुणे येथील ओरिएंटल इंश्युरंस कंपनीत लेखा विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.






ठाणे येथील आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे येथील क्षितीज स्कूल फॉर मेंटली चॅलेंज येथे कार्यानुभव  विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असून ते पूर्णत: कर्णबधीर आहेत. ते या शाळेमध्ये मुलांना अगरबत्ती, मेणबत्ती, कागदी पिशव्या आदी बनविण्याचे शिक्षण देतात. यासोबतच धावणे, गोळाफेक , लांब उडी आदींचे प्रशिक्षणही देतात. त्यांना सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.   




दिव्यांगांसाठी कार्य करणारे डॉ योगेश दुबे आणि प्रा. रवी पुवैय्या यांचा सन्मान
मुंबईतील बोरीवली पूर्व येथील डॉ. योगेश दुबे दिव्यांगांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी दिव्यांगांसाठी शिक्षण , आरोग्य, कौशल्य विकास आदी क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी दिव्यांगांना आधार कार्डद्वारे लिंक करून दिव्यांग कनेक्ट ॲप सुरु केले असून हे कार्य भारतात प्रसिद्ध झाले. दिव्यांगांना त्यांनी तीन चाकी वाहने, व्हिलचेअर, स्टिक आदी साधनांचे  मोफत वाटप केले त्यांच्या या वैविध्यपूर्ण कार्याची दखल घेऊन दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी जेलो कम्युनिकेटर तंत्रज्ञान विकसित केले. या माध्यमातून मंदबुद्धी मुलांना आपल्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान आता फ्लॅशकार्डच्या माध्यमातही उपलब्ध आहे.                          




पिंपरी चिंचवड मनपा पुणे येथील मॉडर्न कॉलेजला पुरस्कार
दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थांना आज सन्मानित करण्यात आले. या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला  तर  खाजगी क्षेत्रात पुणे येथील मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट ठरले  महाविद्यालयाच्या  प्रमुख ज्योत्स्ना एकबोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर स्किपींग लिंक्स, फाँट अँड कलर चेंजिंग, प्रायर एचटीएमएल/सीएसएस टॅगिंग अँड स्क्रिप्ट व्हॅलिडेशन आदी दिव्यांगांना पूरक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मॉडर्न महाविद्यालयाच्या संकेतस्थळाची मोझिला व गुगल क्रोम ब्राऊजरच्या नवीन तृतीय व्हर्जनवर जॉ १७ आणि एनव्हीडीए १६ रिडर्सच्या माध्यमातून चाचणी, संकेतस्थळाच्या प्रत्येक पानावर दिव्यांगांसाठी सुगम्य हा पर्याय देण्यात आला आहे, जो दृष्टीबाधितांना २०० टक्के पेक्षा जास्त आकारात हे पान मोठे करून  पाहण्यास मदत करते.



मुंबई येथील वरळी सीफेस भागातील नॅब इंडिया(नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड) या संस्थेला दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे महासचिव एस.के.सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा