विकास करताना भूमीपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कल्याणामधील आगरी-कोळी महोत्सवाचा समारोप

ठाणे, दि. 2: विकास करताना भूमीपुत्रांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी- कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी कल्याणमध्ये आले होते, तेव्हा ते बोलत होते. यावेळी  पदुम मंत्री महादेव जानकर, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार रमेश पाटील, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, किसन कथोरे, माजी आमदार जगन्नाथ पाटील, समाज उत्कर्ष मंडळाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ भोईर आणि साईनाथ तारे यांची उपस्थिती होती.येथील आधारवाडी नजीकच्या वासुदेव बळवंत फडके मैदान येथे आगरी-कोळी समाज उत्कर्ष मंडळातर्फे 30 नोव्हेंबरपासून आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा आज समारोप  करण्यात आला. यावेळी आगरी कोळी समाजाच्या एका पुस्तकाचेही प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोळीवाड्याची समस्या सोडविण्यासाठी मुंबईनंतर इतरत्रही कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वेगळी विकास नियंत्रण नियमावली तयार करीत आहोत. आगरी समाज जसा एग्रेसिव्ह आहे तसा अनेक बाबतीत अग्रेसर आहे, सातवाहन काळापासून या समाजाने स्वतःचे लढवय्येपण सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा समुद्र वाचला तर संस्कृती वाचेल अशी दूरदृष्टी ठेवून आगरी कोळी समाजाच्या मदतीने किनारपट्टी संरक्षणाची व्यवस्था उभी केली होती. अशा या मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास असलेल्या समाजाची समृद्धी झाली तरच राज्याची समृद्धी होऊ शकते, हे सरकारला माहीत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.नेवाळी येथील आंदोलनकर्त्यांमधील निष्पक्ष व्यक्तींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, गुन्हे परत घेण्याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

खासदार कपिल पाटील यांनी देखील विचार मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा