महात्मा गांधीजींच्या विचारांवर देशाला पुढे नेणार - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने राज्यभर विविध विभागांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा




मुंबई, दि. ६ : सक्षम गावातच देशाची प्रगती दडली आहे असा विचार करून 'गावाकडे चला' अशी साद देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांवर देशाला पुढे नेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


बुधवारी त्यांनी महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्ताने राज्यभर विविध विभागांमार्फत करावयाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


महात्मा गांधीजींची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये साजरी होणार असल्याचे सांगून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, यासाठी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती तर प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. केंद्रीय स्तरावर ही जयंती साजरी करण्यासाठी ५२ कार्यक्रमांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यापैकी २६ कार्यक्रम केंद्र आणि राज्यस्तरावर संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहेत.  यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. शाळा-महाविद्यालयस्तरावर नाट्यस्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील. अभ्यासेतर उपक्रम म्हणून एका शाळेला एक गाव दत्तक देऊन त्या गावात स्वच्छता, पाणी अडवा-पाणी जिरवा, आरोग्याचे संरक्षण अशा कामात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाईल. आदिवासींच्या, महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यक्रम आखले जातील. राज्यातील विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संवाद साधून कार्यशाळांचे-परिषदांचे आयोजन केले जाईल.

क्विट इंडिया मूव्हमेंट वर प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ
महात्मा गांधीजींच्या जीवनावर लघुपट स्पर्धा, कवी संमेलनाचे आयोजन, प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातील. यावर्षी राजपथावर महाराष्ट्राकडून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्विट इंडिया मूव्हमेंटवर चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.


महात्मा गांधीजींनी समाज व्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल ही कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान घेतली जाईल, असेही ते म्हणाले. व्यसनमुक्ती, कुष्ठरोग निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध अशा विषयांचाही यात समावेश करण्यात आला आहे.


३५ जिल्ह्यात खादी महोत्सव
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यात ३५ जिल्ह्यात खादी महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती देऊन ते पुढे म्हणाले, महाखादी प्रोत्साहन व विक्री केंद्र-पुणे च्या धर्तीवर राज्यात विभागीय स्तरावर अशी सहा केंद्रे सुरु करण्यात येतील.  विमानतळावर खादी ग्रामोद्योग मंडळाचे एक भव्य दालन सुरु करण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवत आहोत. राज्यात ग्रामोद्योगाला चालना मिळावी, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळताना गावं सक्षम आणि स्वावलंबी व्हावीत यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्यातून ग्रामोद्योगाची निवड करून त्याचे जिल्हानिहाय क्लस्टर करण्यात येतील. राज्य शासनाने महात्मा गांधीजींचे  दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यास मंजुरी दिली असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘गांधी फॉर टुमारो’ अंतर्गत महात्मा गांधी संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. शासकीय तंत्रनिकेतन वर्धा आणि ग्राम सेवा मंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार सहा महिन्याचा अभ्यासक्रम खादी ग्रामोद्योग मध्ये सुरु करण्यात येईल. याशिवाय रॅली, परिसंवाद, चर्चासत्रे, शिबीरे आयोजित करून गांधीजींचा विचार देशभरातील भारतीयांच्या मनात रुजवला जाईल. व्हिलेज इंडस्ट्री विकसित करणार


राज्यात ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देऊन क्लस्टर स्वरूपात व्हिलेज इंडस्ट्री विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करील. वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद प्रकल्पात ३०० महिलांचे एक क्लस्टर तयार करून त्यांना हळद प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करण्यात येणार आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी येथे  सोलर एलईडी लाईट निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. सेवाग्राममध्ये फर्निचर क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई यांच्याकडून मेटल कास्टिंग निर्मित स्वयंचलित चरखा बसवण्यात आला आहे. त्याची उंची १८ फूट आणि रुंदी ३० फूट आहे, अशी माहिती ही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. ग्रामविकास विभाग या सर्व कामासाठी नोडल विभाग असून महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी विभागाला अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीत विविध विभागांकडून तीन वर्षात करावयाच्या उपक्रमांची मांडणी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा