नीती आयोगाच्या वतीने आकांक्षित जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर; नंदूरबार जिल्ह्यात कुपोषणामध्ये घट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नवी दिल्ली, दि. 27 : राज्यातील नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्याने आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी  केल्यामुळे  जिल्ह्यात कुपोषणामध्ये घट झाल्याचे नीती आयोगाने आज जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या क्रमवारीमध्ये पुढे आले आहे. गतवर्षीच्या पायाभूत क्रमवारीच्या तुलनेत वर्षभरात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा जिल्हा कुपोषणात घट झालेल्या  टॉप 12 जिल्ह्यांमध्ये आला आहे.  नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नीती आयोगात आयोजित पत्रकार परिषदेत देशातील 111 आकांक्षित जिल्ह्यांची दुसरी डेल्टा क्रमवारी जाहीर केली. 5 वर्षाखालील मुलांमधील कुपोषणात घट झालेल्या 12 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये नंदूरबारचा समावेश आहे. यासोबतच आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील उस्मानाबाद 32 व्या  तर गडचिरोली 33 व्या स्थानावर आहे.  वाशिम जिल्हा 69 व्या तर  नंदूरबार  84 व्या स्थानावर आहे.1 जून ते 31 ऑक्टोबर 2018  या कालावधीदरम्यान 49 बिंदूच्या आधारावर आरोग्य, शिक्षण, कृषी व जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या मानकावर देण्यातआलेल्या गुणांकनानुसार देशातील 111 आकांक्षित जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रात मागासलेल्या जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली. प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे 2018 या कालावधीतील प्रगतीच्या आधारे जून 2018 मध्ये आकांक्षित जिल्ह्यांची  पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा