महाराष्ट्र आणि ॲमस्टरडॅम यांच्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी सामंजस्य करार - मुख्य सचिवांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासंदर्भात महाराष्ट्र आणि ॲमस्टरडॅममध्ये  सामंजस्य करार करण्यात आला असून या संदर्भात आज नेदरलँडच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची भेट घेतली. यावेळी ॲमस्टरडॅमचे उपमहापौर उडो कॉक हे उपस्थित होते


कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीकरिता प्रथम प्रकल्प राज्यात सुरु करण्यात येणार आहे. मंत्रालयात आज झालेल्या  बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे स्वच्छ महाराष्ट्र अभियान तसेच स्मार्ट सिटी अभियान इत्यादी विविध प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळाने जाणून घेतली.


कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीची व्यापकता लक्षात घेता प्रथम वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करावे व या प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.


यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाच्या कार्यकारी संचालक सिमा ढमढेरे यांच्यासह ॲमस्टरडॅम शहराचे उप महापौर व काऊन्स्लेट जनरल ग्रिडो टाइलमन, गुंतवणूक आणि वाणिज्य व्यापार संदर्भातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा