मुंबईच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सजग राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.2 : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अतुलनीय कामगिरी बजावली होती. आजही आपल्या सुरक्षेसाठी ते सतत कार्यरत असतात. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी सामान्य नागरिकांनीही पोलिसांचे कान, डोळे बनून सजग राहणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांताक्रूझ येथील 47 नवीन शासकीय पोलीस निवासस्थानांचा हस्तांतरण सोहळा पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस ई-आवास प्रणालीचे उद्घाटन आणि अमिताभ बच्चन अभिनीत मुंबई सुरक्षा आणि जागरुक मुंबईकरया दोन लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे, अभिनेते अमिताभ बच्चन, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, आमदार ॲड.आशिष शेलार, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलीस अहोरात्र मेहनत घेवून जनतेची काळजी घेतात. गेल्या चार वर्षात पोलीस निवासस्थानांसाठी शासनाने विशेष लक्ष दिले आहे. आज उद्घाटन झालेल्या इमारतीमुळे पोलिसांना अतिशय चांगल्या दर्जाची निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. अडीच कोटी रूपये बाजारभावाने किंमत असलेली ही निवासस्थाने शासनाला केवळ 25 लाख रूपये किंमतीत तयार होऊन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय स्वत:च्या मालकीची घरे पोलिसांना मिळावीत, यासाठी बिनव्याजी कर्ज व इतर योजना राबविण्यात येत आहेत.पोलिसांना निवासस्थानाचे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई- आवास प्रणालीमुळे शासकीय निवासस्थान मिळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विलेपार्ले येथे जिवीके या कंपनीच्या सहकार्याने पहिले अत्याधुनिक पोलीस स्थानक बनविण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर पोलीस स्थानके तयार व्हावीत, यासाठी पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून 25 कोटी रूपयांचा निधी श्री. तावडे यांनी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.अमिताभ बच्चन हे प्रत्यक्ष जीवनातही महानायक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ते म्हणाले, आपल्या लोकप्रिय प्रतिमेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रबोधनासाठी करत असतात.

यावेळी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, सातत्याने सुरक्षा प्रदान करणाऱ्या मुंबई पोलिसांचा मला अभिमान आहे. मी त्यांच्यासाठी कधीही मदत करण्यास तत्पर आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कुटुंबियांना घरांच्या चावीचे वितरण करण्यात आले.

विलेपार्ले नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन

विलेपार्ले येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली आणि पोलीस डायरीत शुभेच्छा संदेश लिहिला.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा शि़क्षणमंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, सह-पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा