राज्यपालांच्या उपस्थितीत रंगला नौदलाचा ‘बिटींग रिट्रीट’ सोहळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 4 : तिरंग्याच्या रंगांत न्हाऊन निघालेले गेट वे ऑफ इंडिया’, नौदलाच्या चेतक आणि सी- किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, ‘मार्कोस कमांडोंची प्रात्यक्षिके, कान तृप्त करणारे नौदल बॅण्ड, नौदल जवानांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे संचलन आणि सी कॅडेट कॉर्प्सचे नृत्य ही आजच्या बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित बिटींग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पश्चिम कमांड स्थापनेला यावर्षी 50 वर्षे झाली. त्यामुळे आजचा बिटींग  रिट्रीट कार्यक्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला. नौदलाच्या चेतकआणि सी-किंग हेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे ऑफ इंडियाच्या मागून सी-किंग हेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरुन लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी  त्यांनी केलेली पुष्पवृष्टी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.


हेलिकॉप्टरवरुन दोरीच्या सहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, ‘मार्कोस कमांडोंनी दाखविलेली प्रात्यक्षिके ही बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची  वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरित्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवत होते. टॅटूपथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती. यावेळी जवानांनी बंदुकांसह कवायती केल्या. सी-कॅडेट कॉर्प्सचे नृत्याचा आगळा अविष्कार यावेळी पहायला मिळाला.


शेवटी सर्व दिवे घालविल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाच्या मागे समुद्रामध्ये लांबवर दिव्यांच्या प्रकाशात आयएनएस मुंबई, आयएनएस ब्रम्हपुत्रा आदी  नौदलाच्या युद्धनौकांचे दर्शन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा