पुणे रिंग रोडच्या कामाच्या सादरीकरणाचे आदेश; राजधानीत महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


                        
नवी दिल्ली, दि. 26 : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


श्री. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे सचिव युधविरसिंह मल्लीक आणि केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते .


                                   
पुणे रिंगरोडच्या कामाला गती येणार - गिरी बापट
पुणे रिंगरोडचे काम टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश श्री. गडकरी यांनी या बैठकीत दिले असून यामुळे रिंगरोडच्या कामाला गती येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरी बापट यांनी बैठकी नंतर दिली.


पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहर परिसरात 132 कि.मी. चा बारा पदरी रिंग रोड बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व्हिस रोड बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रिंग रोडच्या माध्यमातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच सातारा व अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग पुण्यात न येता परस्पर शहराबाहेरच जोडण्यात येणार आहेत.  रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 3 हजार 675 कोटींचा खर्च होणार आहे. तर रिंग रोडच्या बांधकामासाठी 1 हजार 900 कोटींचा खर्च येणार आहे यासाठी केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. यास सकारात्मकता दर्शवत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे रिंग रोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे रिंगरोडच्या कामाला गती मिळेल असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.

मनसर टोल नाका स्थलांतरणाच्या कामास गती - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर जिल्हयातील रामटेक येथील मनसर टोल नाका खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय 29 ऑक्टोबर 2018 रोजी परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत यासाठी आवश्यक सहकार्य महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले. त्यानुसार या टोल नाका स्थलांतरणाच्या कामाला गती येणार आहे. यामुळे  रामटेक येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि येथील स्थानिक शेतकऱ्यांना यामुळे  मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे स्थलांतरित करणे,  नागपूर -सावनेर रस्त्यावर चिन्हि11.285 या अपघात प्रवण स्थळावर उड्डापूल बांधणे आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.47 वरील कोराडी महालक्ष्मी मंदिर भागात उड्डापूल बांधण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच  येथील अपघात प्रवण स्थळावर सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी श्री. गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.


या बैठकीत नागपूर -भंडारा 6 पदरी रस्ता, अमरावती जिल्हयातील नांदगाव पेठ टोल नाका, औरंगाबाद शहरातून  जाणारा चिखलठाणा -नगर नाका  14 कि.मी.चा रस्ता, जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कामे, मिरज शहर रस्ता, अमरावती- चिखली रस्ता आद प्रकल्पांचा आढावा  घेण्यात आला.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा