शिधापत्रिका नसलेल्या 49 हजार बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना मिळणार महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ - आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 5 : राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत ज्या कामगारांच्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत, अशा कुटुंबांनादेखील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 48 हजार 553 कुटुंबांना या योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.


यासंदर्भात विमा कंपनी, कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्यात सहा लाख कामगार असून ज्या कामगारांकडे पिवळे अथवा केशरी रंगाची शिधापत्रिका आहे, त्यांना या योजनेतून लाभ देण्यात येतो. मात्र शिधापत्रिका नसलेले 48 हजार 533 बांधकाम कामगार कुटुंबे असून त्यांनाही महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना नोंदणीच्या वेळी जे ओळखपत्र देण्यात येते त्यावर कामगाराच्या तपशिलांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा छायाचित्रासह तपशील दिला जातो. कामगार अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या ओळखपत्रावर योजनेचा लाभ मिळणार आहे. संगणक प्रणालीमध्ये कामगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून दर तीन महिन्यात नवीन नोंदणी होणाऱ्या कामगारांची यादीदेखील संकलित करण्यात येत आहे.
००००
अजय जाधव ५.१२.२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा