गोवर-रुबेला प्रतिबंधासाठी राज्यभरात पहिल्या दिवशी १० लाख ७८ हजार बालकांचे लसीकरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणात सहभागी होण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. 28 : राज्यात कालपासून सुरु करण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात 10 लाख 77 हजार 338 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर राज्यभरात सुमारे 40 ते 50 बालकांना खाज येणे, पुरळ अशा स्वरुपाची लक्षणे जाणवली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरु करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यात सर्वत्र सुमारे 10 हजार 255 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 10 लाख 77 हजार 338 बालकांना ही लस देण्यात आली. सहा आठवड्यात 9 महिने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.गोवर-रुबेलाची लस सुरक्षित आहे. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरविल्या जात आहे, त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत बालकांना या दोन आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे कुठलाही विपरित परिणाम होत नाही. शारीरिक दुर्बलता येत नाही, या सर्व अफवांचे खंडन करीत आरोग्यमंत्र्यांनी राज्यभरातील पालकांना लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

000


अजय जाधव/विसंअ/28/11/18

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा