मुंबईवरील २६/११ चा हल्ला हा मानवतेवरील हल्ला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हॉटेल ताज येथे मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. २६ : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला हल्ला हा फक्त देशावर किंवा समाजावर झालेला हल्ला नव्हता, तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता. मानवतेच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता. दहशतवादाविरुद्ध जगातील सर्व देश आणि सर्व समूहांनी मिळून एकत्र लढा देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस आणि जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना हॉटेल ताज येथील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर, जपानचे राजदूत केंजी हिरामत्सू, इस्त्राईलचे कौन्सुल जनरल याकोब, ब्राझीलच्या कौन्सुल जनरल श्रीमती रोझीमार सिल्वासुझाने आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह शहीदांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी आपले टार्गेट विचारपूर्वक निवडले होते. हॉटेल ताज, ओबेरॉय, नरीमन हाऊससारख्या ठिकाणी हल्ला करून दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला लक्ष्य केले. अशा दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे. 


दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देऊन हे जग जगण्यासाठी सुसह्य ठिकाण बनवूया.

२६
/११ च्या हल्ल्याला मुंबई शहराने निर्धाराने लढा दिला. आता हे संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आले आहे. पोलीस दल अधिक सक्षम करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यावेळी म्हणाले की, २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईकरांनी मोठे शौर्य दाखवले. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिका हा भारत आणि या देशातील नागरिकांच्या नेहमी समवेत आहे.

जपानचे राजदूत केंजी हिरामत्सू यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. दहशतवादविरोधी लढ्यात जपान भारतासह आहे, असे ते म्हणाले. इस्त्राईलचे कौन्सुल जनरल याकोब यांनी यावेळी नरीमन हाऊस येथील हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला. शांतता आणि सुरक्षित जीवनासाठी भारत आणि इस्त्राईल एकत्रित काम करेल, असे ते म्हणाले.ब्राझीलच्या कौन्सुल जनरल श्रीमती रोझीमार सिल्वासुझाने यावेळी म्हणाल्या की, २६/११ च्या हल्ल्याला धैर्याने सामोरे जाऊन दहशतवादासमोर न झुकता त्याचा सामना कसा करावा, याचे उदाहरण मुंबईकरांनी दिले आहे. विद्वेषाच्या धारणांना तिलांजली देऊन शांततेचा पुरस्कार करण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित काम करु, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा