तळोजा एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या कंपन्या तात्काळ बंद करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 28 : तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तात्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 

तळोजा एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक पर्यावरणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयीन दालनात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक(जल), डॉ. य. बा. सोनटक्के, प्रादेशिक अधिकारी नवी मुंबई, डॉ. अ. ना. हर्षवर्धन, पनवेल एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता नितिन वानखेडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


यावेळी श्री. कदम म्हणाले, तळोजा एमआयडीसीतील केमिकल  कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी कासार्डी नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे ही नदी प्रदूषित होत आहे. याचबरोबर आसपासचा परिसर प्रदूषणयुक्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा, याचबरोबर घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी, असे यावेळी श्री. कदम यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ज्या कंपन्यांमध्ये  इटीपी, तसेच एसटीपी  यंत्रणा कार्यान्वित नाही अशा कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात. तसेच तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये २५ टक्के पाणी कपात करण्यात यावी. तसेच संबधित ज्या कंपनीकडे या दोन्ही यंत्रणा आहेत त्या कार्यान्वित आहेत की नाही हे तात्काळ तपासून अहवाल सादर करावा, असेही निर्देश पर्यावरणमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा