विधानपरिषद लक्षवेधी : ३० नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतजात पडताळणी समितीतील अनियमिततेची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 30 : जात पडताळणी समितीतील अनियमिततेची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन संबधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

परभणी जिल्हा जात पडताळणी समितीतील अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना सदस्य अब्दुल्लाह खान दुर्राणी यांनी मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जात पडताळणी समितीतील अनियमिततेची सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता याबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करुन चौकशीत तथ्य आढळल्यास संबधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती नियुक्त करण्याबाबत तपासणी करु.

या लक्षवेधी चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे आदींनी सहभाग घेतला.
00000

संगणक परिचालकांच्या प्रश्नांबाबत लवकरच निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 30 : संगणक परिचालकांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात सामावून घेण्याचा विषय हा धोरणात्मक विषय असून याबाबत संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.


याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, संगणक परिचालकांमार्फत शासनाच्या अनेक योजना व सुविधा ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना पुरविण्यात येतात. संगणक परिचालकांच्या काही अडचणी आहेत. या अडचणी ग्रामविकास विभागामार्फत सोडविण्यात येत आहेत. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून संगणक परिचालकांचे मानधन देण्यात येते. संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडविण्यात आला असून काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीमुळे मानधनाचा विषय प्रलंबित आहे. तोही सोडविण्यात येईल. तसेच संगणक परिचालकांच्या अन्य प्रलंबित विषयांबाबतही निर्णय घेण्यात येईल.

00000

अंबड तालुक्यातील मौजे इंदलगाव येथील वाळूसाठा प्रकरणी संबंधितांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करणार - चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 30 : मौजे इंदलगाव ता. अंबड जि. जालना येथील गट क्र. 46 व वाळकेश्वर गट क्र. 76 येथील जप्त वाळूसाठा प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यामार्फत चौकशी करुन संबंधितांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.


या बाबतची लक्षवेधी सूचना सदस्य विनायक मेटे यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.


यावेळी श्री.पाटील म्हणाले, राज्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी कडक कारवाई करण्यात येते आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच यासंबंधी बैठक आयोजित केली जाईल.


या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सतीश चव्हाण यांनी सहभाग घेतला.
00000


कफ परेड येथील कोळीवाड्याचे सीमांकन लवकरच करणार - चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 30 : कफ परेड येथील कोळीवाड्याचे सीमांकन लवकरच करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.


या बाबतची लक्षवेधी सूचना सदस्य राहूल नार्वेकर यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.


यावेळी श्री.पाटील म्हणाले, मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या सर्वेक्षण व सीमांकनाच्या कार्यवाहीबाबत नेमलेल्या समितीने मुंबई शहर हद्दीतील 7 कोळीवाड्यांची बाहेरील हद्द मोजणीचे काम पूर्ण केले आहे. या मोजणीचे काम सुरु असताना कुलाबा येथील कफ परेड येथे मच्छिमारांची मोठी वसाहत असल्याने या कोळीवाड्याची खास बाब म्हणून कोळीवाडा घोषित करुन त्यांचे सीमांकन व मोजणी करण्यात येणार आहे. मत्स्य विभागील अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करुन उपलब्ध अभिलेखाची पडताळणी करुन याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच मच्छिमारनगर येथील कोळीवाड्यांच्या अन्य समस्यांबाबतही लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येईल. 


या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, रमेश पाटील व अनिल परब यांनी सहभाग घेतला.
00000


रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा देणार
- डॉ. दीपक सावंत
मुंबईदि. 30 : स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील रस्त्यांवरील अपघातांमध्ये जखमी झालेल्या व तात्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस अधिवासाच्या अटीशिवाय परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या 74 उपचारांच्या वैद्यकीय सेवा नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून पहिल्या 72 तासांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती. यावेळी डॉ. सावंत बोलत होते.


डॉ. सावंत म्हणालेया वैद्यकीय सेवामध्ये ऑर्थोपेडिकजनरल सर्जरी,न्यूरो सर्जरीनेत्र तज्ज्ञांच्याकान नाक घसाट्रॉमा या तज्ज्ञ सेवांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत अपघात रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल. प्रति रुग्ण प्रति अपघात 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च या योजनेअंतर्गत अंगिकृत रुग्णालयास अदा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीस सेवा देण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही. अपघाताच्या जागेपासून नजीकच्या अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या 108 रुग्णवहिकेचाती उपलब्ध नसल्यास शासकीय रुग्णवाहिकेचा किंवा ती उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविणेशासनाच्या विचाराधीन असून यावर कार्यवाही सुरु आहे.


यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.

00000

माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध - संभाजी पाटील-निलंगेकर
मुंबईदि. 30 : राज्यातील आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठीयोजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच त्यांच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध आहेअसे माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.


सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या प्रश्नांच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्नांनाग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेनगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी उत्तर दिले.


श्री. निलंगेकर -पाटील आपल्या उत्तरात म्हणालेराज्यात जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची 34 पदे मंजूर आहेत. या मंजूर पदांपैकी 16 पदे भरलेली आहेत. सेवा प्रवेश नियमानुसार अधिकारी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रक्कम वाढवून 25 लाख करण्यात आली आहे. ही रक्कम 48 तासांच्या आत सन्मानाने परिवारास सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वीरपत्नींना मिळणारे तीन हजार रुपयांचे पेंशन वाढवून सहा हजार करण्यात येणार आहे. माजी सैनिकांच्या वाहनांना टोल माफी मिळावी यासाठी शासन सकारात्मक असून बांधकाम विभागाकडे याचा पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


माजी सैनिकांना घर टॅक्स मध्ये सवलत देण्यात यावी यासाठीच्या मागणीसाठी सर्व जिल्हा परिषदांनी विचार करावा तसेच ग्रामसभेत ठराव घेण्यात यावा, यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
00000

माणगाव येथील चेतक एंटरप्रायजेसच्या प्रकल्पासंदर्भात चौकशी करुन कार्यवाही करणार - प्रवीण पोटे-पाटील
मुंबई, दि. 30 : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील चेतक एंटरप्रायजेसच्या प्रकल्पासंदर्भात आलेल्या तक्रारीसंबंधी चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.


या बाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. पोटे-पाटील बोलत होते.


यावेळी श्री. पोटे-पाटील म्हणाले, मे. चेतक एंटरप्राईजेस लि. यांच्या सदर प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा व आवाजाचा त्रास होत असल्याबाबतच्या मुख्याधिकारी, माणगांव नगरपंचायत यांच्याकडे प्राप्त तक्रारी त्यांच्याकडून दि. 20.11.2018 रोजीच्या पत्रान्वये उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड, जि. रायगड यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सदर प्रकल्पास दि. 22.11.2018 रोजी समजपत्र देण्यात येऊन दि. 28.11.2018 रोजी प्रकल्प बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.


या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला होता.
00000

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र व संविधानाचे प्रास्ताविक कायमस्वरुपी मंत्रालयात लावण्याबाबत कार्यवाही सुरु - मदन येरावार
मुंबई, दि. 30 : मंत्रालय इमारतीमध्ये दर्शनी भागावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र (पोट्रेट) व संविधानाचे प्रास्ताविक कायमस्वरुपी लावण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेत दिली.


याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. येरावार बोलत होते.


यावेळी श्री. येरावार म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी मुख्य वास्तूशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्यासमवेत पाहणी करुन जागा निश्चित करावी व त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाची पुढीलआवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. तसेच यासंबंधी लवकरच कार्यवाही होईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी सहभाग घेतला.
00000

खालापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई देणार - मदन येरावार
मुंबईदि. 30 : मौजे अंजरुण ता. खालापूर जि. रायगड येथील गट क्र.5366 व 68 मधील बाधित शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेत दिली.


याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. येरावार बोलत होते.


यावेळी श्री. येरावार म्हणालेमौजे अंजरुण ता. खालापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी गट क्र. 5366 व 68 या मिळकतीतील जमिनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाद्वारे संपादित करण्यात आल्या आहेत. या भूसंपादनाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारणाकडून कार्यवाही सुरु आहे.


यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.
00000

यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान पदवी महाविद्यालय स्थापणार - सदाभाऊ खोत
मुंबई, दि. 30 : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची निकड लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.


श्री. खोत पुढे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन सन 2017-18 मध्ये घोषणा केल्यानुसार यवतमाळ येथे शासकीय कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जमिनीची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्याच वेळी इथे पारंपरिक अभ्यासक्रम सुरु न करता नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून अद्ययावत अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव मागविण्यात आला. या उपसमितीने दिलेल्या प्रस्तावानुसार शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य ख्वाजा बेग यांनी लक्षवेधी उपस्थ‍ित केली होती.
***
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा