विधानसभा प्रश्नोत्तरे : दि. ३० नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतबोगस पटसंख्या दाखविलेल्या शाळांवर लवकरच  कारवाई
- शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई, दि. 30 : शाळांच्या पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. आता राज्यातील शाळांमध्ये सरलप्रणाली सर्व विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे. त्यामुळे बोगस पट दाखविण्यास आता वाव राहिलेला नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत  सांगितले.


राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. तावडे  म्हणाले, 2011 मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये राज्यातील 1 हजार 404 शाळांमध्ये  50 टक्क्यापेक्षा कमी पटसंख्या आढळून आली होती. त्यानुसार त्या शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यादरम्यान संबंधित शाळा उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाकडे काही स्पष्टीकरणे मागविली होती. ती केल्यानंतर पुन्हा कारवाई सुरु करुन 11 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. पुन्हा या शाळा उच्च न्यायालयात गेल्यानंतर नैसर्गिक न्यायतत्वाची आवश्यक ती सर्व प्रक्रिया अवलंबण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार सर्व आवश्यक कार्यवाही करुन येत्या दोन महिन्यात  गुन्हे दाखल करण्यात येतील, असे श्री. तावडे म्हणाले.


 सरलप्रणालीमध्ये माहिती भरण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 85 टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रणालीशी जोडण्यात आले असून ही प्रक्रिया शंभर टक्के व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही श्री. तावडे म्हणाले. या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
0000


शिक्षकभरती प्रक्रिया पवित्रपोर्टलद्वारे - शिक्षणमंत्री 

मुंबई, दि. 30 : राज्य शासनामार्फत यापुढे शिक्षक भरतीसाठी पवित्रया पोर्टलचा वापर करण्यात येणार आहे.  ऑनलाईनरित्या पारदर्शक पद्धतीने शिक्षकभरती होणार असल्याने शिक्षणाच्या दर्जातही वाढ होणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगाने सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना श्री. तावडे बोलत  होते. श्री. तावडे म्हणाले, उच्च न्यायालयाने पवित्रप्रणालीला मान्यता दिली आहे. या प्रणातीलअंतर्गत शिक्षकभरती प्रक्रियेत राज्य शासन उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार शाळांकडे शिफारस करेल. राज्य शासनाकडून रिक्त जागांच्या प्रमाणात शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्तीचे अधिकार शाळांना असणार आहेत. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षक मिळणार असल्याने शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.


राज्यभरात 2012 नंतर शाळांमध्ये 4 हजार 11 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देताना अनियमितता झाल्याचे  आढळून आले. त्यापैकी 3 हजार शिक्षकांची चौकशी पूर्ण झाली असून 600 हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या. उर्वरित 1 हजार 11 नियुक्त्यांच्या बाबत सुनावणी घेऊन निर्णय देण्याची कार्यवाही सुरू आहे.


श्री. तावडे म्हणाले, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीमार्फत आकृतीबंध तयार करण्यात आला असून लवकरच भरती प्रकिया सुरु करण्यात येईल. कालच विधीमंडळात संमत झालेल्या विधेयकानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी या भरतीमध्ये  राखीव जागांची अंमलबजावणी करण्यात येईल.


या चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री योगेश सागर, डॉ. सुनील देशमुख, एकनाथ खडसे, ॲड. आशिष शेलार, वैभव पिचड, सुभाष पाटील यांनी  सहभाग घेतला.
0000

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविणार
- पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर
मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत यापुढे राज्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले.


नाशिक जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत सदस्य छगन भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. लोणीकर बोलत होते. ते म्हणाले, लासलगाव विंचूरसह 13 व येवला तालुक्यातील 38 गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीमार्फत या योजनेसाठी निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव आहे.


श्री. लोणीकर म्हणाले, राज्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मोठ्या वीज बिलामुळे चालविण्यात अडचणी  येतात. त्यावर उपाय  म्हणून या योजना सौरऊर्जेवर रुपांतरित करण्यात येतील.  रात्रंदिवस पंप चालविणे आवश्यक असणाऱ्या मोठ्या योजनांमध्ये सौर ऊर्जा व महावितरणची वीज अशा दुहेरी पद्धतीने या योजना चालविण्यात येतील.


या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, गणपतराव देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, बच्चू कडू, पांडुरंग बरोरा यांनीही सहभाग घेतला.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा