नाथजोगी समाजातील कुटुंबांना घरासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून अनुदान देणार - प्रा. राम शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : भटक्या जमातीतील नाथजोगी समाजातील बेघर असणाऱ्या कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून अनुदान दिले जाणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव आल्यास तो तातडीने मंजूर केला जाईल, असे प्रतिपादन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.


नाथजोगी समाजातील विविध प्रश्नासंदर्भात मंत्री प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधिमंडळातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर पारवे, विभागाचे सहसचिव भा.रा. गावित, समाजाचे प्रतिनिधी अनिल शिंदे, रमेश जगताप, पांडुरंग सेंगर आदी यावेळी उपस्थित होते.


प्रा. शिंदे म्हणाले, नाथजोगी समाज हा भटकंती करून जीवन जगतो. या समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून भटक्या जाती व विमुक्त जमातीतील कुटुंबांना घराच्या बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून नाथजोगी समाजातील कुटुंबांनी घरासाठी प्रस्ताव पाठविल्यास त्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल. तसेच नाथजोगी समाजाला जातीचे दाखले व ओळखपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


यावेळी आमदार श्री. पारवे यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा