ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची विधानपरिषदेत माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 28 : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाने विशेष ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलेले आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत शासनाच्या संबंधित विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेले असून ज्येष्ठ नागरिक धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली.


ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत सदस्य हेमंत टकले यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना श्री. बडोले बोलत होते.


यावेळी श्री. बडोले म्हणाले, ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करताना शासनाच्या संबंधित विभागांनी याबाबतचे शासन निर्णय निर्गमित केले असून उर्वरित शासन निर्णय लवकरच निर्गमित करणार आहे. राज्यात पालघर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु असून याबाबतची आढावा बैठक लवकरच घेण्यात येईल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत असून आवश्यक निधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल. वृद्धाश्रमांसाठी आमदार निधीतून निधी देण्याबाबत व वृद्धांच्या विमा पॉलिसीबाबतही लवकरच बैठक आयोजित केली जाईल.


या चर्चेत परिवहनमंत्री दिवाकर रावते, सदस्य सर्वश्री भाई गिरकर, सतेज पाटील, ख्वाजा बेग, अनिकेत तटकरे, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा