महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर उत्तम सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 26 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यास येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सर्व संबंधित विभागांमार्फत उत्तम सुविधा द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.


या संदर्भात समन्वय समिती व सर्व संबंधित विभागांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दीपक केसरकर, विधिमंडळ प्रतोद आमदार राज पुरोहित, आमदार सर्वश्री भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, तसेच मनपा आयुक्त अजोय मेहता, गृह (विशेष) विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता,  पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल, सह आयुक्त देवेन भारती, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष सर्वश्री महेंद्र साळवे, रवी गरुड, चंद्रशेखर कांबळे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारे विविध उपक्रम हे  समन्वय समिती व शासन यांच्यातील उत्तम समन्वय असल्याचे एक चांगले  उदाहरण आहे. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची उत्तम व्यवस्था झालीच पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने केलेले नियोजन उत्तम आहे. तथापि, त्यातील प्रत्येक घटकांची उजळणी व्हावी, तसेच भविष्यातील आव्हानांचादेखील विचार करुन योग्य ते नियोजन करावे. तसेच सदस्यांच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकच्या सूचनांचाही विचार करुन त्याची यथायोग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पोलीस यंत्रणेमार्फतही उत्तम अशी नियंत्रण व्यवस्था राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या सुविधा व यंत्रणेचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घेतला. तसेच सर्व सदस्यांचे या संदर्भातील म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच समन्वय समितीने तयार केलेल्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  समन्वय समितीचे सरचिटणीस श्री. कांबळे यांनी आपल्या सविस्तर निवेदनातून बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट विभाग, पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सामाजिक न्याय विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तटरक्षक, रेल्वे, साप्रवि, नगरविकास विभाग आदींमार्फत अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबाबत विनंती केली. तसेच आमदार भाई गिरकर, कालिदास कोळंबकर यांनीही आपले विचार मांडले.


या बैठकीस समन्वय समितीचे सदस्य सिद्धार्थ कासारे, मयुर कांबळे, ॲड. अभया सोनावणे तसेच सर्व संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा