विधानपरिषद प्रश्नोत्तरे : दि. २९ नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस केंद्राकडे करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 29 : अस्तित्वात असलेल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.  सदस्य शरद रणपिसे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील धनगर समाजाला सध्या भटक्या जमाती या प्रवर्गात आरक्षण आहे. मात्र त्यांना अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी टाटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला धनगर समाजाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या संस्थेने याबाबतचा सर्वंकष अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालावर आधारित शिफारशी केंद्राला सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण अभ्यासाअंती शिफारशी पाठविण्यात येतील.  संविधानातील तरतुदींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य धनंजय मुंडे, रामहरी रुपनवर, हरिभाऊ राठोड यांनी सहभाग घेतला.
०००००
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न मर्यादा वाढविणार - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे
मुंबई, दि. 29 : राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात  उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनादेखील परदेश शिष्यवृत्तीसाठीची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.


श्री. कांबळे म्हणाले, त्या त्या प्रवर्गातील संबधित विभागामार्फत परदेश शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न्न मर्यादा सहा लाख तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाख ठेवण्यात आलेली असली तरी त्यानुसारच त्या त्या विभागामार्फत योजनेचे निकष, अटी शर्ती, विद्यार्थी निवड संख्या व योजनेची नियमावली विहित करण्यात आलेली आहे.


उपरोक्त विषयावर सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा