विधानसभा प्रश्नोत्तरे : दि. २९ नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
घोड धरण प्रकल्पग्रस्तांना मोबदला वितरित- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 29 : अहमदनगर जिल्ह्यातील घोड धरण प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही करुन प्रकल्पबाधितांना मोबदला दिल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.


सदस्य श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी घोड धरण प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांचे लाभ देण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री. पाटील म्हणले, हा घोड धरण प्रकल्प 1954 ते 1965 या कालावधीतील असल्याने मौजे वडगाव-शिंदोडी, माठ, म्हसे, राजापूर, दाणेवाडी आदी पुनर्वसित गावांना पुनर्वसन अधिनियम 1976 मध्ये तरतूदी लागू होत नसल्यामुळे नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेले नाही. गावठाणातील उपलब्ध नागरी सुविधा व पुरवावयाच्या नागरी सुविधा याबाबत आराखडा तयार करुन अंदाजपत्रके सादर करण्याबाबत‍ संबंधित यंत्रणेस सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पबाधितांसाठी शासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
०००००

परवानगीपेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी
अहवाल प्राप्त होताच दिलीप बिल्डकॉन कंपनीवर कारवाई
- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 29 : सावंतवाडी तालुक्यातील मौजे सोनुर्ली येथील दिलीप बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीने परवानगीपेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी अहवाल प्राप्त होताच कारवाई करु, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


सदस्य श्री. भरत गोगावले यांनी परवानगी पेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले, दिलीप बिल्डकॉन कंपनीला 1 लाख 50 हजार ब्रास काळा दगड हे गौण खनिज उत्खननासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु या कंपनीने परवानगी व्यतिरिक्त जास्तीचे उत्खनन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्यक्ष किती ब्रास उत्खनन केले हे निश्चित करण्यासाठी ईटीएस मशीनद्वारे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत. संबंधित कंपनी दोषी आढळल्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. ईटीएस मशीन उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा नियोजन निधीमधून खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असेही                 श्री. पाटील म्हणाले.
०००००

हिंगणघाटचे पशु वैद्यकीय रुग्णालय सुरु - पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर
मुंबई, दि. 29 : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे पशु वैद्यकीय रुग्णालय सुरु असून जनावरांना वेळेत उपचार मिळत आहेत. तसेच सर्व रिक्त पदे भरली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य समीर कुणावार यांनी हिंगणघाटचे पशु वैद्यकीय रुग्णालय बंद असल्याबाबत तसेच रिक्त पदे भरली नसल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना श्री. खोतकर म्हणाले, पशु वैद्यकीय रुग्णालयातील पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही दोन पदे मे, 2018 मध्ये भरली आहेत. तसेच या दवाखान्यात पशुवैद्यकीय उपचारासाठी आलेल्या जनावरांवर वेळेत उपचार केले जातात. उपचाराअभावी एकही जनावर मृत्युमुखी पडलेले नाही.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा