विधानसभा प्रश्नोत्तरे : दि. 28 नोव्हेंबर, 2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोगावरील उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा लवकरच बसविणार
- वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 28 : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्करोगावर उपचारासाठीच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याविषयीचा सर्वंकष प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. या संस्थेस कर्करोगावरील उपचाराच्या अनुषंगाने 25 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठिकाणी सर्व यंत्रसामुग्री बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिले.

सदस्य सुधाकर कोहळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.महाजन बोलत होते. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, वीरेंद्र जगताप, डॉ. सुनील देशमुख, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.
0000


वनक्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणार - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 28 : वनक्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व इतर कामांसाठी जमीन वळती करताना निकष पूर्ण होणे आवश्यक असून निकष पूर्ण होत असल्यास तात्काळ जमीन वळती करुन कामांना गती दिली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


वनविभागाच्या अख्यत्यारित वनक्षेत्रातील प्रलंबित कामांच्या अनुषंगाने सदस्य शंभुराज देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, नळ पाणीपुरवठा योजना व इतर कारणांकरिता वनक्षेत्र वळते करुन शासकीय यंत्रणेमार्फत कामे करण्यासाठी केंद्र शासनाच्या वन संवर्धन कायद्यानुसार निकषांचे पालन होणे आवश्यक असते. 1 हेक्टरपर्यंत वनक्षेत्र वळतीकरणाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार उप वनसंरक्षकांना आहेत. त्यातही निकषांचे पालन होणे गरजेचे आहे. वनक्षेत्र वळते करावयाचे असल्यास संबंधित 1 हेक्टर क्षेत्रात 75 पेक्षा कमी झाडे असावीत हाही एक महत्त्वाचा निकष आहे.


ते पुढे म्हणाले, पाटण व कराड तालुक्यातील (जि. सातारा) डोंगरी व दुर्गम भागात गावातील पाणीपुरवठा योजना व इतर कामांच्या 13 पैकी निकषात बसणारे 2 प्रस्ताव यापूर्वीच मान्य करण्यात आले असून 2 प्रस्तावांना लवकरच मान्यता दिली जाईल. इतर 9 प्रस्ताव निकषांमध्ये बसविण्यासाठी आवश्यक ती पूर्तता केली जाईल, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


वनक्षेत्रातील प्रलंबित कामांच्या अनुषंगाने समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून अधिवेशनानंतर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्यात येईल. सदस्यांनी प्रलंबित कामांबाबतची माहिती आपणाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करत असताना काही वेळा अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रयत्न केला जातो. अशा प्रसंगी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास मज्जाव करणे अपेक्षित आहे. मात्र, वनक्षेत्रात नियमानुसार काम होण्यास कोणी अधिकारी बाधा आणत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव नाईक, बाळासाहेब पाटील, गणपतराव देशमुख यांनी सहभाग घेतला.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा