होम डायनिंग पर्यटनास राज्यात चालना देणार - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३ : स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी राज्यात होम स्टे टुरीजमला चालना देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एअर बीएनबीसमवेत करार करुन एलिफंटा लेणी परिसरात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर होम डायनिंगचा अनुभव देणाऱ्या पर्यटनालाही राज्यात चालना दिली जाईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे सांगितले.

मुंबईतील द बोहरी किचनचे चीफ इटींग ऑफिसर मुनाफ कपाडीया यांनी आज त्यांच्या घरी सुरु असलेल्या होम डायनिंग संकल्पनेविषयी मंत्री श्री. रावल यांच्याकडे सादरीकरण केले, त्यावेळी मंत्री श्री. रावल बोलत होते.

श्री. कपाडीया यांनी द बोहरी किचनच्या माध्यमातून होम डायनिंग संकल्पनेस चालना दिली आहे. त्यांच्या राहत्या घरी आठवडाअखेर पर्यटक येऊन विविध बोहरी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. यासाठी श्री. कपाडीया यांनी समाज माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात जाहिरात करुन देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. होम डायनिंगची ही संकल्पना राज्यातील वऱ्हाडी, सावजी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी इत्यादी विविध खाद्य संस्कृतींसाठीही लागू करुन स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांना घरगुती भोजनाचा आस्वाद देता येऊ शकेल, असे श्री. कपाडीया यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. रावल म्हणाले, श्री. कपाडीया यांनी द बोहरी किचनच्या माध्यमातून बोहरी खाद्यसंस्कृतीला उजाळा दिला आहे. होम डायनिंग संकल्पनेस पर्यटकांचा मिळणारा प्रतिसादही यामाध्यमातून समोर आला आहे. प्रत्यक्ष स्थनिकांच्या घरी जाऊन भोजनाचा आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पर्यटकांना संबंधित संस्कृतीही जाणून घेता येते. स्थानिकांनाही या माध्यमातून चांगला रोजगार मिळू शकतो. त्यामुळे येत्या काळात द बोहरी किचनच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वऱ्हाडी, सावजी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी अशा विविध खाद्यसंस्कृतींच्या होम डायनिंग अनुभवास चालना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा