रिपब्लिक ऑफ ऑस्ट्रियाच्या राजदूतांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 6 : रिपब्लिक ऑफ ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत मिसेस ब्रिगीटी ओपिंगर वॉलशॉफर  (Brigitte Oppinger-Walchshofer) यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची आज भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण व्हावी. मुंबईचे बॉलिवूड हे फक्त भारतातच नव्हे तर जगातील सर्वांचेच आकर्षणाचे केंद्र आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांना तसेच या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी ऑस्ट्रियामध्ये येण्याबाबत, मिसेस ब्रिगीटी ओपिंगर वॉलशॉफर यांनी श्री. तावडे यांच्याशी चर्चा केली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून बॉलिवूडच्या निर्माता दिग्दर्शकांसाठी ऑस्ट्रियाची माहिती देण्याबाबतचा कार्यक्रम ऑस्ट्रियाच्या वतीने मुंबईत आयोजित करावा, त्याचपद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास ऑस्ट्रियाला समजावा, या दृष्टीने महाराष्ट्र सरकार आणि ऑस्ट्रिया सरकार यांच्या सहकार्याने एक कार्यक्रम आयोजित करण्याबाबतची चर्चाही याप्रसंगी करण्यात आली. ऑस्ट्रिया आणि महाराष्ट्रामधील सांस्कृतिक संबंध आणि पर्यटनाच्या दृष्टीने देवाणघेवाण करण्यासाठी आगामी काळात कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. यासाठी ऑस्ट्रियाच्या उपक्रमांना महाराष्ट्रात चालना देण्यासाठी सरकार सर्व सहकार्य करेल. याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख ऑस्ट्रियाच्या नागरिकांना होण्यासाठी त्यांनीही अशा पद्धतीचा उपक्रम आयोजित करावा, अशी सूचनाही श्री. तावडे यांनी ऑस्ट्रियाच्या राजदूतांना केली. याप्रसंगी ऑस्ट्रियाचे कौन्स्युलेट जनरल आर. जे. वॅकील उपस्थित होते. याप्रसंगी श्री. तावडे यांनी मिसेस ब्रिगीटी ओप्पींजर-वॉल्चशोफर यांना पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा