विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ; विश्व शांती सभागृह शांततेचा संदेश देणार - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतपुणे दि. 2 : हिंसाचार हा मानवतेचा शत्रू असून आज संपूर्ण जगासमोर हिंसाचाराचा मोठा प्रश्न आहे. परंतु विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य असून डॉ. विश्वनाथ कराड यांनी वर्ल्ड पीस डोम निर्माण करून जगाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला मुर्त स्वरूप दिले असल्याचे गौरोद्गार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज काढले.

     
लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती विदयापीठाच्यावतीने विश्व शांती सभागृह (वर्ल्ड पीस डोम) आणि विश्व शांती ग्रंथालयाचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते.  
       
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस यु‍निवर्सिटीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे मार्गदर्शक मंडळाचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, डॉ. मंगेश कराड, राहुल कराड उपस्थित होते.
   
उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडू म्हणाले, जगाला शांततेचा संदेश देण्याची भारताची पंरपरा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड भारतीय संस्कृतीत घालण्यात आली आहे. भारताच्या भूमीत, पाण्यात, हवेत, प्रकाशात ज्ञानाचे तेज आहे. भारतीयांचे हे ज्ञान जगाने मान्य केले आहे. मात्र या ज्ञानात आणि पारंपारिक कौशल्यात वृध्दी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
     
प्रगती आणि समृध्दीसाठी शांततेची आवश्यकता आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि साधेपणाचा विचार दिला. संपूर्ण  जगाने हा विचार स्वीकारला आहे. आजच्या काळातही हा विचार उपयुक्त आहे. भारताच्या प्रत्येक परंपरेमागे विज्ञान आहे. भारतीय परंपरेप्रमाणे माता, मातृभाषा आणि मातृभूमीचा सर्वांनी आदर केला पाहिजे. देशाच्या भल्यासाठी सर्वांनी निसर्ग, संस्कृती आणि एकता जपली पाहिजे.

शांततेचा संदेश देणारा वर्ल्ड पीस डोम प्रेरणादायी- मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शांततेचा संदेश देणाऱ्या या सर्वात मोठ्या वर्ल्ड पीस डोमची इतिहासात नक्कीच नोंद होईल. संत ज्ञानेश्वरांच्या नावाने उभारलेला हा डोम सर्वांना शांततेची प्रेरणा देईल. पसायदानाच्या माध्यमातून जगाच्या शांततेची, समृध्दतेची  प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केली. समस्त मानवाच्या कल्याणाची संकल्पना त्यांनी जगात सर्वात पहिल्यांदा मांडली. अल्पायुष्यात ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणाचा मंत्र दिला. मानवातील वाईट गोष्टी संपण्याची प्रार्थना त्यांनी केली.

स्वामी विवेकानंदांनी आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली. जागतिक परिषदेत त्यांनी विश्व कल्याणाचा मंत्र दिला. शांततेशिवाय मानवाचे कल्याण शक्य नाही, त्यामुळे शांततेसाठी संपूर्ण जगाने एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला. भारताचे सुपूत्र असणाऱ्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेचे तत्वज्ञान दिले. त्यांच्या 150 व्या जयंती निमित्त या डोमचे लोकार्पण होत आहे, हा दुर्मिळ योग आहे. विश्वशांती, संस्कृती, ज्ञानाचा संदेश देण्यासाठी आणि भारताचे रूप जगासमोर आणण्यासाठी हे वर्ल्ड पीस डोम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.   
     
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, स्वामी विवेकानंद हे माझ्या जीवनाचे आदर्श असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या आशीर्वादाने माझे काम सुरू आहे. सन  2005 साली या विश्वशांती प्रार्थना सभागृहाची संकल्पना माझ्या मनात आली, तेव्हापासून या डोमच्या कामाला सुरूवात केली. जगभरातील संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे पुतळे या सभागृहाच्या परिसरात उभारण्यात आले आहेत. 21 व्या शतकात भारत विश्व गुरू म्हणून पुढे येईल असे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते, त्याचेच प्रतिक म्हणून या प्रार्थना सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
           
डॉ. विजय भटकर  म्हणाले, मानवतेचा संदेश देणाऱ्या या सभागृहाचे आज लोकार्पण होत आहे, त्याचा मला आनंद होत आहे. शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विविध धर्मांचे प्रमुख, सामान्य लोकांच्या उपस्थितीत या वास्तूचे उद्घाटन होत आहे. विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा संगम यामध्ये करण्यात आला आहे. भविष्यातील सदृढ समाजासाठी हे सभागृह दिशादर्शक ठरेल.
           
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी या विश्व शांती प्रार्थना सभागृहाचा मोठा उपयोग होईल. या माध्यमातून डॉ. विश्वनाथ कराड यांनी मोठे काम केले आहे, विश्व शांततेचा त्यांचा हा विचार चिरंतन राहील.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते विश्व शांती ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री. नायडू यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या सभागृहातील पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.     मान्यवरांच्या हस्ते वर्ल्ड पीस डोमच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. यावेळी एमआयटीचे कुलगुरू इंद्रकुमार भट, प्रास्ताविक राहुल कराड यांनी केले.आभार डॉ. मंगेश कराड यांनी मानले.

या कार्यक्रमाला विविध धर्माचे अभ्यासक, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा