सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा वाढवून द्यावा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : अधिकाधिक भारतीय मुस्लिमांना हज यात्रेला जाता यावे यासाठी सौदी अरेबिया सरकारने भारताला हज यात्रेकरुंचा कोटा वाढवून द्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.


येथील हॉटेल ताजमध्ये "हज उमराह इंटरनॅशनल टुरिझम फेअर"चे आयोजन करण्यात आले. या फेअरचे उद्घाटन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


सौदी अरेबियातील आघाडीच्या 40 पर्यटक कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्री. रावल यांनी सौदी अरेबिया आणि महाराष्ट्र यांच्यात अपेक्षित असलेल्या पर्यटन वृद्धिबद्दल व्यक्तिशः प्रत्येक कंपनीसमवेत चर्चा केली.दोन्ही देशात होऊ शकेल अशा क्रुझ पर्यटन, मेडिकल पर्यटन आणि धार्मिक पर्यटन यावर चर्चा झाली.


भारतात असलेल्या अजमेर येथील ख्वाजा मोइनोद्दीन चिश्ती दर्गा, मुंबईतील हाजी अली दर्गा, दिल्लीतील जामा मशीद, ताजमहल आदींबद्दल जगभरातील मुस्लिम नागरिकांना आकर्षण आहे. त्यांना भारतात आणावे. सौदी नागरिकांचे बॉलिवूड प्रेम मोठे आहे दोन्ही देशातील संबंध आणि पर्यटन वृद्धीसाठी याचा उपयोग करण्यात येईल, असे श्री. रावल यांनी सांगितले.


जगातील मोठी मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे अवघा 1 लाख 70 हजाराचा मिळणारा हज यात्रेकरू कोटा भारतासाठी अत्यल्प आहे. तो वाढवून द्यावा. प्रत्येक मुस्लिमासाठी पवित्र असलेल्या हज यात्रेकरूंची व्यवस्था करण्याचे महत्त्वपूर्ण काम टुरिस्ट कंपन्या करीत आहेत, असे गौरवोद्गारही श्री. रावल यांनी काढले.


कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांच्यासह हैदर आझम, वसीम खान, मोहम्मद काझम अली खान आदी उपस्थित होते. हज यात्रा काळात आवश्यक असणाऱ्या हॉटेल, केटरिंग, प्रवासी तिकीट, पासपोर्ट, वाहन आदी सर्व सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांनी आपले दालन या फेअरमध्ये उभारले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा