सबकी योजना सबका विकास’ अभियानाचे थाटात उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा भारत घडवू मंत्री पंकजा मुंडे


 मुंबई दि.2 : महात्मा गांधी यांनी खरा भारत खेड्यात राहतो, खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असा नारा दिला, त्याच  विचारांची आज दीडशे वर्षांनीसुद्धा गरज लागत आहे. ग्रामीण भागात चांगले जीवन जगण्यासाठी सगळे मिळून गाव स्वच्छ ,सुंदर बनवू, आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या विचारांचा भारत घडवू, असे प्रतिपादन ग्राम विकास, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पोषण महा एक जन आंदोलनपुरस्कार वितरण सोहळा आणि सबकी योजना सबका विकासअभियानाचे उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राम विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाच्या आयुक्त इंद्रा मालो यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, स्वच्छता, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले तरच खेड्यांचा विकास होऊ शकतो. शहरांकडे जाणारी लोंढे  थांबवता येऊ शकतात, हे करण्यासाठी ग्रामीण उद्योगाला चालना, युवकांना उद्योग व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगाराचा प्रश्न मिटवला पाहिजे हेच विचार, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबविले आहेत. राज्यात शौचालय 100 टक्के बांधण्यात आली आहेत. शौचालयाचा वापर नागरिकांनी केला पाहिजे, राज्याचा स्वच्छतेमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री मुंडे यांनी यावेळी ग्रामीण भागातील महिला आणि शाळेतील मुलींना 5 रूपयांत  देण्यात येणाऱ्या सॅनेटरी नॅपकीनची अस्मिता योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ग्राम विकास  विभागाच्या वतीने राबवण्यात येणारे शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणा-या सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, माझी कन्या भाग्यश्री आदी योजना राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सबकी योजना सबका विकास प्रभावीपणे राबवतांना महिलांचा सहभाग महत्वाचा


गावच्या विकासात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वांनी मिळून ही योजना आपली योजना आहे, या योजनां आपल्या फायद्यासाठी आहेत, यासाठी प्रत्येकाचा पुढाकार महत्त्वाचा असल्याचे सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या की,गावच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आज पर्यंत महिलांना विकास प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्यामुळे विकास गतीने होऊ शकला नाही. यासाठी ग्रामसभेच्या प्रभावी अंमलबजावणीत ग्रामपंचायत सदस्यांसह महिला, स्वयंसहायता समूहातील महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले

पोषण महा अभियानात विविध 52 हजार कार्यक्रम

पोषण अभियान हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा देशातील समग्र पोषणावर आधारित महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवण्यात आला. राज्यात हा कार्यक्रम महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत यशस्वीपणे राबविण्यात आला या कार्यक्रमात राज्यात विविध एकूण  52 हजार कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमांमध्ये एक कोटी पन्नास लाख लोकांनी सहभाग नोंदवला असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

ग्राम बालविकास केंद्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी ताईंचा गौरव

कुपोषणाच्या विळख्यातून तीव्र कुपोषित बालकांना बाहेर काढण्यासाठी राज्यात ग्राम बाल विकास केंद्र हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पालघरच्या प्रीती पाटील, अमरावतीच्या मंगल विधाळे, परभणीच्या संगीता ढवळे,बीडच्या उर्मिला जाधव,हिंगोलीच मंगल भिसे यांचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. तसेच राज्यातील स्वयंसहाय्यता गटांना गौरवण्यात आले यामध्ये उस्मानाबाद येथील सावित्रीबाई महिला स्वयंसहायता गट यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले, सोलापूर येथील नवदुर्गा महिला स्वयंसहायता गट ,दुसरा क्रमांक देण्यात आला तर वर्धा येथील जया महिला स्वयंसहायता गटस तृतीय क्रमांक देण्यात आला.

यावेळी समुदाय गुंतवणूक करणाऱ्या स्वयंसहायता गटांना धना घटना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. यामध्ये पालघरच्या जीवनदायी स्वयंसहायता गट, बीड येथील नयी रहा तर रायगड येथील भैरवनाथ स्वयंसहायता गट यांना धनादेश देण्यात आला.दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी नोकरीचे पत्र देऊन पत्र देण्यात आले. तसेच पोषण अभियानात उत्कृष्ट काम करणा-या नाशिक, नंदूरबार, गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद याजिल्हयांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा