सिडकोने ७२० कोटी रुपयांचा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्ध रितीने पूर्ण करावा - सुधीर मुनंगटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 15 :  प्लॅनिंग, क्वॉलिटी आणि स्पीड या  पी.क्यू.एस सूत्राचा उपयोग करून सिडकोने  720 कोटी रुपयांचा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्ध रितीने पूर्ण करावा, असे  निदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.  


आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रभूदास भिलावेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, अमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते


चिखलदरा हे विदर्भातील प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाचे विशेष महत्त्व आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे  वर्षभरात साधारणत: दीड लाखापर्यंत पर्यटक भेट देतात. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदऱ्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन  शहराचा विकास करण्यासाठी सिडको आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकास आराखडा राबविला जात आहे. त्यात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पर्यटक निवास, नेचर ट्रेल, मचान, साहसी क्रीडा संकुल,  तेथील पर्यटन पॉइंट्सचा विकास, यासारख्या कामांचा समावेश आहे.


आराखड्यात चिखलदरा येथे मालवीय पाँइंट ते भीमकुंड-एनर्जी पॉइंटपर्यंत अंदाजे १.५ कि.मी  लांबीचा आणि खोल दरीतून जाणारा रोप-वे, हरीकेत ते शिवसागर पॉइंटपर्यंत ५०० मीटरचा स्काय वॉकदेखील प्रस्तावित करण्यात आला आहे.  हे काम पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी एक कोटी रुपयांची रक्कम येत्या विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक सुविधा केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे. सर्व व्ह्यू पॉइंटना जोडणारा २७ कि.मी. लांबीचा आणि १२ कि.मी. रुंदीचा गोलमार्गही (रिंगरोड) या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. याच्या भूसंपादनाचे काम सुरु आहे.


अर्थमंत्री पुढे म्हणाले की, मानव विकास कार्यक्रमांतर्गत चिखलदऱ्याचा समावेश आहे.  येथील मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्पन्न यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत.  यातून तिथे रोजगार निर्मितीचे उपक्रम राबविले जावेत, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा