'स्वस्थ भारत यात्रे' च्या यशस्वितेसाठी सर्वांनी योगदान देण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

स्वस्थ भारत यात्रा १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात


मुंबई, दि. ११: राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वस्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'ईट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वस्थ भारत यात्रा' चे देशात दिनांक १६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. 'स्वस्थ भारत यात्रा' बाबत माहिती देण्यासाठी एमसीए क्रिकेट क्लब बीकेसी, वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, एफएफएएसआय चे महाराष्ट्र विभागीय संचालक मुथ्थूमारन, दिल्ली येथील सहायक संचालक अखिलेश गुप्ता, एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जगमीत मदान, एएफटीएसआय संस्थेचे अध्यक्ष प्रबोध हलदे, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त सी. बी. पवार आदींसह अन्न व औषध प्रशासनचे राज्यभरातील सहआयुक्त, सहायक आयुक्त यावेळी उपस्थित होते.


 

यावेळी श्री. बापट म्हणाले, एफडीए ने काल ऑनलाईन अन्न पदार्थ पुरवठा धारकांना अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ११३ आस्थापनांवर कारवाई केली. एकीकडे गरीब जनतेला एकवेळचे अन्न मिळण्यास अडचण येते. तर अन्न भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत भेसळ करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. 'स्वस्थ भारत यात्रा' ही जनतेला चांगल्या अन्नाबाबत जागृती करण्याचे साधन ठरणार आहे. या यात्रेत एफडीए, एनसीसी यासह सर्वच प्रशासन तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे. अन्नाबाबतची जागृती ही यात्रेपुरती मर्यादित न राहता निरंतर राहावी, असेही ते म्हणाले.यावेळी प्रास्ताविकात डॉ. दराडे म्हणाल्या की, स्वस्थ भारत यात्रेमध्ये स्वस्थ मेळावे, अन्न चाचणी, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमांचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. स्वस्थ भारत यात्रेची प्रत्यक्ष सुरुवात जागतिक अन्न दिनाच्या पूर्वसंध्येला दि.१६ ऑक्टोबर २०१८ रोजी होणार असून त्यामध्ये सहभागी होणारे संपूर्ण प्रवास सायकलवरून करणार आहेत. यात्रेसाठी संपूर्ण देशात एकूण ६ मार्ग बनवले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ३ मार्गांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात १८ ते २४ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. प्रत्येक ट्रॅकवर साधारण २५ सायकलपटू  असणार आहेत. हे सायकलपटू ५० ते ६० कि.मी. अंतर पूर्ण करुन प्रत्येक टप्प्यात २ ते ३ गावात  आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत व महाराष्ट्रातील ३३ ठिकाणी भेटी देणार आहेत आणि पुढील सायकल पथकाला रिले बॅटन सुपूर्द  करणार आहेत.

या यात्रेचा 'ईट राइट इंडिया' हा  मुख्य उद्देश असून 'आरोग्यदायी खा, सुरक्षित खा, पौष्टिक खा' ( ईट हेल्दी, ईट सेफ, ईट फोर्टीफाईड) या त्रिसूत्रावर आधारित आहे. 'ईट हेल्दी' या संकल्पनेमध्ये 'आज से थोडा कम' म्हणजेच आहारातील साखर, मीठ व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करणे, आरोग्यदायी अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करणे विशेष करुन अखंड कडधान्य, तृणधान्याचा वापर वाढवण्याबाबतचा कार्यक्रमाचा अंतर्भाव होतो. 'ईट सेफया संकल्पनेमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेवर भर देणे, खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे, भेसळ रोखण्यासाठी सोप्या अन्न भेसळ ओळखणाऱ्या पद्धतींबाबत जनजागृती करणे आदींचा अंतर्भाव होतो. 'ईट फोर्टीफाईड' या संकल्पनेत ॲनिमियामुक्त भारत हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये फोर्टिफाईड मीठाचा वापर वाढवणे, त्यास मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच विविध शासकीय योजना व कार्यक्रमामध्ये फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.

स्वस्थ भारत यात्रेमध्ये निवडलेल्या तसेच न निवडलेल्या शहरामध्ये, गावामध्ये 'ईट राइट इंडिया' संदर्भातील व्हिडिओ शो, कार्यक्रम, प्रदर्शन, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रमग्राहकांना अन्न चाचणीची सुविधा आदींचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर येथे विशेष आरोग्य मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


स्वस्थ भारत यात्रेची सांगता २७ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे होणार आहे, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा