एक विद्यार्थी-एक वृक्ष : ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १२ : एक विद्यार्थी-एक वृक्ष याप्रमाणे राज्यातील स्काऊट गाईड, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी २०१९ मधील ३३ कोटी वृक्ष लागवडीत सहभागी होणार असून  हे विद्यार्थी हरित महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.

राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या वृक्षलागवडीत या संघटनांच्या सक्रिय सहभागाबाबतची निश्चिती करण्यासाठी वन सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्काऊट-गाईड, एनएसएस, एनसीसी, संरक्षण दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते.


या सर्व यंत्रणांनी वृक्षलागवडीचा त्यांचा परिपूर्ण आराखडा तयार करावा असे सांगून श्री. खारगे म्हणाले, बालमन हे अतिशय संवेदनशील असते. याच वयात वृक्षलागवड आणि पर्यावरण रक्षणाचा संस्कार त्यांच्या मनात रुजल्यास त्यांची भावी वाटचाल ही त्याच सकारात्मक वृत्तीतून पुढे जाईल.  येत्या नोव्हेंबर अखरेपर्यंत या सर्व संघटनांनी वृक्षलागवडीत सहभागी होणारे विद्यार्थी, त्यांची नावे, वृक्ष लागवडीच्या जागा निश्चित कराव्यात व ही सर्व माहिती वन विभागाला कळवावी. वृक्ष लागवडीसाठी लागणारी रोपे, खड्डे खोदण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री वन विभाग उपलब्ध करून देईल तसेच कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रजातीचे रोप लावावे याचे मार्गदर्शनही वन विभागाकडून केले जाईल असे ते म्हणाले.

या सर्व विद्यार्थ्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत हरित सेनेचे सदस्य करून घेतले जावे असे सांगून ते पुढे म्हणाले, या सर्व संघटनांमधून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामाजिक कामात सहभागी होत आहेत. ३००० महाविद्यालयांमध्ये एनएसएस कार्यान्वित असून यात जवळपास ३ लाख २७ हजार विद्यार्थी सहभागी आहेत. एनसीसी अंतर्गत जवळपास ९९ हजार विद्यार्थी सहभागी आहेत. स्काऊट आणि गाईड्समध्ये जवळपास १० लाख विद्यार्थी सहभागी आहेत.  ही युवा शक्ती इतर उपक्रमांप्रमाणे वृक्षलागवड आणि वृक्ष संगोपनात सहभागी झाली आणि त्यांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले तर त्यांना वन विभागाने तयार केलेल्या हरित दिनदर्शिकेतील अनेक उपक्रमात सहभागी करून घेता येईल.

मुंबईत वृक्षलागवडीसाठी जागेची कमतरता असली तरी कांदळवन रोपे लावण्यास मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांदळवनाची रोपे लावण्यास प्राधान्य द्यावे तसेच त्यांच्या हद्दीतील जलसंपदा प्रकल्पांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. त्यांना वन विकास महामंडळ सहकार्य करेल, असेही श्री. खारगे यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा