छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाशी संबंधित मच्छीमारांच्या समस्या राज्य शासन निश्चितपणे सोडविणार - महादेव जानकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 23 : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची उभारणी ही महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेशी निगडीत बाब आहे. यासाठी सर्व मच्छीमार बांधवांचे सहकार्य आवश्यक असून त्यांच्या भूखंड, नुकसानभरपाई आदी सर्व समस्या निश्चितच सोडविल्या जातील, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिली.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाशी निगडीत मच्छीमारांच्या समस्येबाबत गठित समितीची बैठक श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.  यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार रमेश पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव विजय चौधरी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण तांडेल आदी उपस्थित होते.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या उभारणीमुळे वसाहतीवर परिणाम होणाऱ्या मच्छिमारांना भूखंड देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत, असे सांगून श्री. जानकर म्हणाले, स्मारकाच्या उभारणीमुळे त्या परिसरातील मत्स्यसाठा व सागरी जीवांवर होणारा परिणाम याबाबतचा अहवाल केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थेकडून (सीएमएफआरआय) लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यात येईल. त्यानुसार मच्छीमारांना नुकसानभरपाईबाबत विचार करण्यात येईल. याशिवाय मच्छीमार सहकारी संस्था प्रवासी नौका घेत असल्यास स्मारक उभारणीचे काम सुरू होताच कामगारांना कामाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नौका वापरण्याबाबत कंत्राटदाराशी करार करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बैठकीस महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, नौदल, सागरी पोलीस, तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी तसेच मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./23.10.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा