भुयारी मार्गाने समुद्रात पाणी सोडून मुंबईला पूरमुक्त करण्याचा विचार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

पालकमंत्री सुभाष देसाई यांची महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक पातळीवर पूरनियंत्रणाचे काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत बैठक


मुंबई, दि. 5 : रस्त्यांवर साठणारे पावसाचे पाणी 30 मीटर खोल भुयारात जमा करुन माहुल येथील प्रस्तावित उदंचन केंद्राद्वारे समुद्रात सोडल्यास पावसाळ्यात मुंबई पूरमुक्त होण्यास मदत होईल.


मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक पातळीवर पूरनियंत्रणाचे काम यशस्वीपणे करणाऱ्या तज्ज्ञांची एक बैठक घेतली. या बैठकीत यावर विचार करण्यात आला.

कमी वेळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईत काही ठिकाणी काही वेळासाठी पूरसदृश स्थिती निर्माण होऊन वाहतुकीला व पादचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. परळ नाक्यातून शिव चौकापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर पावसाळ्यादरम्यान एक दोन वेळेला तरी जलमय होतो. हा भूभाग समुद्राच्या पातळीपेक्षा एक मीटरहून अधिक सखल आहे. त्यामुळे जमलेले पावसाचे पाणी लगेच समुद्रात वाहून जात नाही. त्यातही एका तासात ५० मिमी पेक्षा अधिक पाणी कोसळले आणि तीच वेळ समुद्राच्या भरतीची असेल तर पाणी जमिनीवर, रस्त्यांवर तुंबून राहते. या परिस्थितीतून सुटका व्हावी यासाठी महापालिका गांभीर्याने उपाय शोधत आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली.


या बैठकीस बँकॉक येथे २०११ मध्ये आलेल्या पूरसंकटावर मात करणारी कायमस्वरूपी योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई मनपाचे उपायुक्त सुधीर नाईक व पर्जन्यजल वाहिन्या विभागाचे उपमुख्य अभियंता प्रमोद खेडकर आदी उपस्थित होते.


आता महापालिकेने सल्लागारांची नियुक्ती करून प्रकल्प अहवाल तयार करून द्यावा असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीअंती दिले. योग्य नियोजन आणि उपाययोजना यामुळे मुंबई लवकरच पूरमुक्त होईल असा विश्वासही श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा