प्रत्येक ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव असणे आवश्यक - अरूण देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

जागो ग्राहक जागोया मोहिमेंतर्गत अशासकीय सदस्य व अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजनमुंबई, दि. 23 : प्रत्येक ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव असणे आवश्यक आहे, त्यासाठी त्याचे सातत्याने प्रबोधन करत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी केले. जागो ग्राहक जागोया मोहिमेंतर्गत अशासकीय सदस्य व अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा संचालक दिलीप शिंदे उपस्थित होते.


श्री. देशपांडे म्हणाले, ग्राहकांसाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांप्रती जागृती असणे आवश्यक आहे. हे जनजागृतीचे काम शासकीय तथा अशासकीय सदस्यांनी सातत्याने करीत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक खात्यामार्फत ग्राहकांसाठी तक्रार नोंदविता यावी यासाठी वैधमापन, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा या सारख्या विभागांनी टोल फ्री क्रमांक जारी केलेले आहेत. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर 72 तासांच्या आत कारवाई होत असते. मात्र याची माहिती सर्वसाधारण नागरिकांना सातत्याने दिली गेली पाहिजे यावरही त्यांनी भर दिला पाहिजे.


ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात अशी माहिती श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, जागो ग्राहक जागो या मोहिमेचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. याच दिवशी दर वर्षी राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. या दिनाचे औचित्य साधून ग्राहक दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी ग्राहकांची जागरुकता या निमित्ताने वाढविण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष श्रीमती स्नेहा म्हात्रे, शिधावाटप परिमंडळ ठाणेचे उपनियंत्रक नरेश वंजारी, वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक पी. एम. बिराजदार आणि कन्झ्युमर्स गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबईचे सचिव डॉ. एम. एस. कामथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय व अशासकीय सदस्य तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा