नागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्त्वपूर्ण ठरतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

चीनच्या नागरी सुरक्षामंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी भेट


  
मुंबई, दि. 23शांघाय आणि मुंबई ही दोन जुळी (सिस्टर सिटीज) शहरे आहेत. त्यामुळे शांघायमधील चीनच्या नागरी सुरक्षेबाबतच्या उपाययोजना मुंबईतही उपयुक्त ठरू शकतील. तसेच विविध विकासाभिमुख प्रकल्पांत चीनचे सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण ठरू शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. चीनचे नागरी सुरक्षामंत्री झाओ केझी यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


यावेळी चीनच्या शिष्टमंडळातील सदस्य भारतातील चीनचे राजदूत लुओ झाओई, चीनचे नागरी सुरक्षा विभागाचे उपमंत्री झू गान्लू, उपसचिव मेंग याँग, महासंचालक नागरी सुरक्षा झांग होंन्ग्बो, ली झियान्फ, आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे महासंचालक लियो जीनराँग, परराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपमहासंचालक श्रीमती होऊ याँकी, गुओ लीन यांच्यासह गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर,  मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई ही भारताची वित्तीय, व्यावसायिक तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने राजधानी आहे. मुंबई हे देशासाठी पॉवर हाऊस समजले जाते. भारताच्या आर्थिक वृद्धीच्या बाबतीत तसेच परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राचे आणि पर्यायाने मुंबईचे योगदान सर्वाधिक आहे. मुंबई हे जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण तसेच संवेदनशील शहर आहे. त्यामुळे येथील सुरक्षेच्या उपाययोजनांच्या बाबतीत आम्ही नेहमीच सतर्क आहोत. गेल्या दहा वर्षात त्यादृष्टीने अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळेच चीनच्या नागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान याठिकाणी निश्चितच उपयुक्त ठरेल. शांघाय आणि मुंबई यांना सिस्टर सिटीज म्हटले जाते. त्यामुळे शांघायमधील नागरी सुरक्षेच्या उपाययोजना मुंबईत राबविणे महत्त्वपूर्ण ठरले. त्यादृष्टीने दोन्ही देशांचे सहकार्य वृद्धिंगत करता येईल.

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा तसेच अन्य महत्त्वपूर्ण उत्पादन क्षेत्रातही चीनच्या कंपन्या कार्यरत आहेत. आगामी काळातही हे सहकार्य असेच वाढीस लागेल असे प्रयत्न केले जातील.
चीनचे नागरी सुरक्षामंत्री केझी म्हणाले, नागरी सुरक्षा आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाशीही महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दहशतवादाशी मुकाबला आणि शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने भारत आणि चीनचे नेतृत्व सहमत आहेत. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरावरील दहशतवादी हल्ल्याचे वैषम्य वाटते. शांघाय या शहरासह चीनच्या अन्य प्रांतातही मेट्रो तसेच नागरी सुरक्षा  विकासाभिमुख प्रकल्प राबविण्यात आले आहेत. याच दृष्टीने भारतातील विविध प्रकल्पांतील गुंतवणूक आणि सहकार्यालाही चालना देण्याचे प्रयत्न आहेत. 

यावेळी श्री. केझी यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचे कौतुक केले. तरूण आणि भविष्याचे वेध घेणारे नेतृत्व असल्याचे नमूद करून ते म्हणाले की,आर्थिक विकासासह पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि नागरीकरणाचा महाराष्ट्रातील वेग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच भारताच्या सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदानही लक्षवेधी ठरेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा