ऊर्जा विभागाच्या तीन लोकाभिमुख योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 16 : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या, लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या तीन अभिनव योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

ऊर्जा विभागाचे गेल्या चार वर्षात अत्यंत चांगले कार्य सुरु असून शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्यांना उपयुक्त असे निर्णय विभागामार्फत घेतले जात आहेत. आज उद्‌घाटन झालेल्या तीनही योजना या महत्त्वपूर्ण असून पर्यावरणपूरक अशा आहेत. या सर्व योजनांमुळे येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांना दिवसा वीज देणे शक्य होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 लाख सौर पंपांना मान्यता दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शेतकरी केंद्रीत अशा या योजना असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्की होईल.

विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास निश्चितच टळेल. तसेच इंधनाचा भारदेखील कमी होईल. मोटर वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेट्रिक वाहन तयार करीत आहेत. त्यामुळे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला चांगली मागणी आहे. राज्यातील विद्युत अभियंता, पदविकाधारक तसेच आयटीआयच्या युवकांनाही विद्युत स्टेशन देण्याबाबतचा निर्णय देखील महत्वाचा आहे. रोजगाराची मोठी संधी यातून मिळणार आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक विद्युत निर्माण करण्याची क्षमता असलेले आपले राज्य आहे, असे सांगून त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

  

मागेल त्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी-चंद्रशेखर बावनकुळे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभिनव अशा योजनेचे उद्‌घाटन संपन्न होताना आनंद व अभिमान वाटत आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन परिवर्तन झाले पाहिजे हा ध्यास घेऊन ऊर्जा विभाग आपल्या योजना राबवित आहे. नीती आयोगाने कौतुक केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना असून अशा प्रकारची ही देशातील पहिली योजना आहे. राज्यातील जो शेतकरी बांधव ही योजना मागेल त्याला दिली जाईल असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

श्री.बावनकुळे म्हणाले, या सौर वाहिनीमुळे महत्त्वाचे असे फायदे होऊ शकतात. यामध्ये विद्युत खर्च, विद्युत पुरविणे खर्च यात मोठी बचत होत आहे. विभागाने 5 लाख 18 हजार वीज कनेक्शन दिली असून उर्वरित दोन ते अडीच लाख लोकांनादेखील जून 2019 अखेर जोडण्या दिल्या जातील. आयटीआयधारक विद्युत पदविकाधारक आयटीआयच्या 23 हजार मुलांना मार्च 2019 पर्यंत विविध गावांमध्ये ग्राम मॅनेजर म्हणून काम मिळेल. प्रती विद्युत कनेक्शन 9 रुपये प्रमाणे त्यांना देखभाल दुरुस्ती खर्च दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजनांचा लाभ मिळेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकातून संजीव कुमार यांनी या तीनही अभिनव योजनांची सविस्तर माहिती दिली. तद्‌नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनांचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा