पालघर येथील शासकीय कार्यालयाच्या बांधकामाचा वेग वाढविण्याचे विष्णू सवरा यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 15 : सिडकोच्या माध्यमातून पालघर येथे नवनगर निर्माण करताना तेथील महत्त्वाच्या शासकीय इमारती मार्च 2019 अखेर सर्व सोयी सुविधायुक्त असे पूर्ण करण्यासाठी बांधकामाचा वेग वाढवावा. तसेच जिल्हा नियोजन भवनाचे काम महत्त्वपूर्ण असून त्याबाबत विशेषत्वाने लक्ष द्यावे,  असे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे दिले.


यासंदर्भातील एक आढावा बैठक मंत्री श्री. सवरा यांच्या दालनात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, विभागाचे सह सचिव सुनील पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नवनगरच्या बांधकामाबाबत मंत्री श्री. सवरा यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीस उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम सुरु करावे. नागरिकांच्या महत्त्वाच्या अशा दैनंदिन गरजेच्या तहसिल, प्रांत कार्यालयाचे बांधकामदेखील सुरु करावे, असे श्री. सवरा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मार्च 2019 अखेर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय किमान तळ व पहिला मजला सहित पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


यावेळी सिडको, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, पोलीस प्रशासन, नगरपरिषद व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांना गती
पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाच्या अपूर्ण बांधकामाबद्दलही आढावा बैठक श्री. सवरा यांच्या दालनात झाली.


यावेळी पालघर जिल्ह्यात 20 ठिकाणी नवीन आश्रमशाळांना जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणचे बांधकाम सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. विभागामार्फत बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींचे हस्तांतरण विभागाकडे करावे. ऑक्टोबरअखेर तयार झालेल्या आश्रमशाळांचे उद्घाटन व प्रस्तावित आश्रमशाळांचे भूमिपूजन कसे होईल हे पहावे, असे निर्देश श्री. सवरा यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा