डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


शाळा, महाविद्यालये, रात्रशाळा यामध्येही वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा


मुंबई, दि. 15 : माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रभावी लिखाणाने देशाच्या युवा पिढीला एक नवीन विचार दिला. भारताची युवा पिढी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींच्या लिखाणामुळे अधिक ज्ञानवंत झाली. कलाम यांची प्रेरणा घेऊन या वाचन प्रेरणा दिनापासून प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट, मोबाईल चे सर्व इलेक्ट्रानिक गॅझेट बाजूला ठेवून काही तास वाचन करावे, हीच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देशावासियांकडून खरी आदरांजली ठरेल, असे मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.


श्री. तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या फिरत्या ग्रंथालयाचा शुभांरभ आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ‘डेक्कन क्वीन’ आणि ‘पंचवटी एक्सप्रेस’ या दोन गाड्यांमध्ये शानदारपणे झाला. सर्वप्रथम मुंबई ते पुणे या डेक्कन क्वीनमध्ये आणि नंतर मुंबई ते नाशिक या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा प्रारंभ झाला. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर निशुल्कपणे उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देणार आहेत. या ट्रॉलीचे उद्घाटनही मराठी भाषामंत्री श्री. तावडे व आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. जैन उपस्थित होते. यावेळी श्री. तावडे यांनी डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना प्रवासात वाचनासाठी पुस्तके दिली.


याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्री. तावडे म्हणाले, ट्रेनमधील वाचनदूत हे तेथील प्रवाशांना भेटून पुस्तक देणार आणि मुंबईहून निघाल्यानंतर पुण्यामध्ये गाडीमधून उतरताना पुन्हा जमा करणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी याच पध्दतीने पुस्तक घेऊन वाचायचे आणि पुन्हा पुस्तक जमा करायचे असा हा उपक्रम आहे. दर दोन-तीन महिन्यानंतर पुस्तके बदलत जातील, त्यामुळे प्रवास तर चांगला होईल, वाचन करत होईल, असा हा प्रयोग डेक्कन क्वीन आणि पंचवटीमध्ये मुंबई-नाशिक, नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे, पुणे-मुंबई करीता हा उपक्रम सुरु करत असल्याचे मराठी भाषामंत्री श्री. तावडे यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे मी मनापासून आभार मानतो, हा उपक्रम सुरु करण्यासाठी त्यांनी खूप मदत केली आणि मराठी भाषा विभाग व मध्य रेल्वे मिळून हा उपक्रम यशस्वी करेल, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला.


आपल्याकडे मराठी, इंग्रजीमध्ये भरपूर पुस्तके आहेत, साहित्य आहे आणि ज्याला जे वाचायचे आहे, त्याला तशी पुस्तके उपलब्ध करुन देणे हे सरकारला सहज शक्य आहे. कारण ही पुस्तके वाचून परत घेणार आहे. आपण १२ हजार वाचनालयांना पुस्तके देत असतो, त्यामध्ये ही दोन वाचनालये वाढलेली आहेत. पण चांगली दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करेल, असे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.



अनघा सोनावणे या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार
डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य गुरुकुल शाळेत इ. थी मध्ये  शिकणाऱ्या अनघा संतोष सोनावणे या विद्यार्थीनीचा श्री. तावडे व श्री. शेलार यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरात अनघाने तब्बल १२० पुस्तकांचे वाचन केले आहे. गेल्या वर्षीच्या वाचन प्रेरणा दिनापासून अनघाने वाचनाला प्रारंभ केला. याप्रसंगी अनघाचे आई-वडील उपस्थित हेाते.



रात्र शाळेतही वाचन प्रेरणादिन साजरा
डोंगरी येथील डोंगरी महापालिका शाळेमध्ये मॉडेल नाईट हायस्कूल येथे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रात्रशाळेत शिक्षण घेणारे अनेकजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा