विविध विकासकामे तांडा-वस्तीपर्यंत पोहोचविणार- गोर बंजारा स्नेह मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव
सेवालाल महाराज यांच्या नावाने तांडा-रस्ता पोहोच योजना सुरु करणार

नागपूर, दि. : बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देऊन विविध विकासकामे तांडा-वस्तीपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जवाहर वसतीगृह येथे गोर बंजारा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार निलय नाईक, किसनभाऊ राठोड, श्रीमती श्वेता शालिनी, महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, आत्माराम चव्हाण, श्याम राठोड, श्रीमती प्रगतीताई पाटील, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, गोर बंजारा समाजाला मोठा इतिहास असून या समाजाने वेळोवेळी विविध माध्यमातून आपले योगदान दिले आहे. शांतताप्रिय या समाजाने आपली संस्कृती, परंपरा व स्वाभिमान विशेषत्वाने जपला आहे, हे कौतुकास्पद आहे. गोर बंजारा समाजातील विविध क्षेत्रात रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. गोर बंजारा समाजातील अनेक तरुण आज विविध क्षेत्रात स्व-कर्तृत्वावर पुढे येत आहेत. बंजारा समाजाचा मोठा भाग आजही तांडा-वस्तीवर राहतो. सेवालाल महाराज यांच्या नावाने तांडा-रस्ता पोच योजनासुरु करण्यात येईल. याद्वारे तांड्यांपर्यंत रस्ते पोहोचविण्यात येतील.सेवालाल महाराजांनी समाजाला बळकट केले. पोहरादेवी विकास आराखड्यामधील विविध विकासकामे प्रगतीपथावर असून यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यातून भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करुन देण्यात येतील. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात आले असून यासाठी जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे दुष्काळी भागातील भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. जलसंधारणाची विविध कामे प्रगतीपथावर असून याद्वारे टंचाईमुक्तीसाठी शाश्वत कामे निश्चित स्वरुपात होतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.श्री. गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सुखी-समृद्ध होण्यासाठी सिंचनाची कामे वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यात आली असून अमरावती विभागालाही सिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महामार्गांचे बांधकाम करतानाच आता नदी व नाले खोलीकरणाची कामेही हाती घेण्यात येत आहे. यातूनही जलसंधारणाच्या कामाला गती मिळाली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते मोठ्या प्रमाणावर जोडले गेले. आता वाड्या-वस्त्या व तांडेही रस्त्याने जोडण्यात येतील, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.  

श्री. नाईक म्हणाले, गोर बंजारा समाज कणखर व कष्टाळू आहेत. देशात व राज्यात सध्या विविध विकासकामे वेगात सुरु असून नव्या पिढीने फिनिक्स पक्षाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विकासाच्या मार्गावर चालावे.

यावेळी किसनभाऊ राठोड, श्रीमती श्वेता शालिनी व अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. प्रवीण पवार यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा