जगाचा कर्णधार होण्याची भारतात क्षमता; कौशल्यांच्या आधारावर देश पुढे जाणार- सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत      
मुंबई दि. 16 : जगाचा कर्णधार होण्याची भारतात क्षमता असून देशातील प्रतिभासंपन्न युवकांना योग्य मार्गदर्शन, दिशा दिल्यास ती व्यक्ती, तो परिवारच नाही तर देश पुढे जाणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल इंडिया, द वे फॉर्वर्ड इन हायर एज्युकेशन' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य आणि उद्योजकता विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार किरीट सोमय्या, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन चे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे, जागतिक बँकेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जॉर्ज कोरासा,  केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे सह सचिव राजेश अग्रवाल, नॅशनल स्किल कॉर्पोरेशनचे मनिष कुमार, राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, 'टीस' चे सदस्य सतीश प्रधान, ओआरएफ मुंबईचे धवल देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


भारत माता की जय म्हणताना या जय च्या मागे माझे काय योगदान किंवा कृती आहे  याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारत सर्वात युवा देश असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून  युवकांना योग्य दिशेने पुढे नेण्याची गरज आहे. आता शस्त्राच्या नाही तर कौशल्याच्या आधारावरच पुढे जाता येणार आहे.


भारतात परंपरागत कौशल्य मोठ्या प्रमाणात असून प्रत्येक परिवार एक कौशल्य विद्यापीठ असल्याचे सांगून अर्थमंत्री पुढे म्हणाले, आपल्याला जॉब सिकर नाही तर जॉब क्रिएटर निर्माण करावयाचे आहेत.  समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. चंद्रपूर येथे वनाधारित उद्योग संधींचे पहिले कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन होत आहे. राज्यात अशी सहा कौशल्य विकास विद्यापीठे स्थापन केली जाणार आहेत. आपण तीन हजार कोटी रुपयांच्या अगरबत्तीच्या काड्या आयात करत होतो. ही बाब मनाला खटकली आणि आय.टी.सीच्या सहकार्याने, त्यांच्यासमवेत सामंजस्य करार करून चंद्रपूर येथे अगरबत्ती काड्या तयार करण्याचे कौशल्य आपण‍ विकसित केलं आहे. पोंभुर्ण्यात महिला बचतगटांमार्फत टुथपिकची निर्मिती करण्यात येत आहे.विदर्भातील सात जिल्ह्यांमधील  नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करून रोजगारसंधी विकसित करण्यात येत आहेत. आपल्या युवकांमध्ये आणि महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना व्यवस्था उपलब्ध करून देतांना ग्राहकाची गरज ओळखून, बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.कौशल्य हे रोजगार देणारे असावे - संभाजी पाटील निलंगेकर
कौशल्ये ही त्या व्यक्तीला रोजगार निर्माण करून देणारी, त्याच्या उत्पन्नात वृद्धी करणारी असावीत असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आपल्या लोकसंख्येला उत्तम वर्कफोर्स मध्ये रुपांतरित करण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी स्टार्टअप, स्टॅण्डअप, मेक इन इंडिया, सारख्या संकल्पनांमधून केलं आहे. महाराष्ट्रात ही बेस्ट कॉम्पेटेटिव्ह वर्क फोर्स निर्माण केला जात आहे.  उद्योगाची मागणी आणि गरज लक्षात घेऊन आयटीआय आणि आयआयटीमधील अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत. आयटीआय उद्योगांना संलग्न करण्यात आले आहेत. शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील मूलभूत स्टार्टअप कार्यक्रमांना सक्षम करण्यावरही राज्य शासन भर देत आहे. राज्यात 23 जिल्ह्यात 'स्टार्टअप यात्रा' जाणार आहे. तेथे असलेल्या उपलब्ध रोजगार संधींचा अभ्यास आणि उपलब्धता याचा देखील त्यात समावेश करण्यात आला आहे. स्टार्टअप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला कौशल्य विकासात सर्वाधिक पारितोषिके मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येत असून त्यांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण हे जवळपास 98 टक्के असल्याचे तसेच शिक्षण हे रोजगाराभिमुख करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.


यावेळी चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनीही कौशल्य विकास, रोजगार संधी आणि बाजारपेठ या तीन गोष्टींची सांगड घालून करावयाच्या प्रयत्नांवर भर दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा