व्यवसाय सुलभतेमध्ये भारताची ७७ व्या स्थानी झेप; मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 31: जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) निर्देशांकामध्ये भारताने आजवरचे सर्वोच्च असे 77 वे स्थान गाठले असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
      
मुख्यमंत्री अभिनंदन करताना म्हणतात, 2014 मध्ये भारत जागतिक व्यवसाय सुलभतेमध्ये 142 व्या स्थानी होता. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व्यवसाय सुलभता धोरणावर भर देऊन त्याची  यशस्वी अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मागील चार वर्षांत भारताने तब्बल 65 स्थानांची झेप घेतली आहे. मागील दोन वर्षांचा विचार केला तर ही झेप 53 स्थानांची (2015 मधील 130 क्रमांकावरुन 77 वर ) आहे. तर मागील एका वर्षात 23 स्थानांनी (2017 मध्ये 100 वरुन 77 ) भारताने आगेकूच केली आहे.


ही कामगिरी प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या कठोर मेहनतीचे फळ असून ही झेप म्हणजे जागतिक पटलावर भारताने नोंदवलेला मोठा विक्रम आहे. या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचेही लक्षणीय योगदान आहे. देशाचे वित्तीय केंद्र असलेल्या मुंबईतील व्यावसायिक सुलभतेसाठी अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. राज्यातील उद्योगांसाठी एक खिडकी योजनेसह परवाना सुलभता आणि अन्य निर्णय घेतल्याने यात सुधारणा झाली. भविष्यात आणखी भरीव योगदान देण्यासाठी  राज्य प्रयत्न करेन, असे आश्वस्त करुन या यशामध्ये वाटा असलेल्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी २ मराठी चित्रपटांची व ८ लघुपटांची निवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




नवी दिल्ली : 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची व 8 मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

आज चित्रपट दिग्दर्शक राहुल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली 13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये  सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.

मराठी चित्रपटांमध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पाआणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघीया चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे.



लघुपटचित्रपटांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवसया मराठी लघुपट प्रदर्शनाने प्रारंभ होणार आहे. मेधप्रणव पोवार यांचा हॅपी बर्थ डे’, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम’, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम’, सुहास जहागिरदार यांचा येस आय ॲम माऊली’, शेखर रणखांब यांचा पाम्पलेट’, गौतम वझे यांचा आई शपथ’, आणि स्वपनील कपुरे यांचा भर दुपारीया 8 लघुपटांचा समावेश आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना : कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे राजकुमार बडोले यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत जमिनी देण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करण्याच्या योजनेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री.बडोले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

श्री.बडोले म्हणाले, राज्यातील अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमिनी देण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम तयार करुन संविधानदिनी जमीन वाटप सुरु करावे. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना अनुदान देण्यासंदर्भातले प्रलंबित प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देशही यावेळी श्री. बडोले यांनी दिले.


या व्हिडीओ कॉन्फरन्सला राज्यातील समाजकल्याण विभागाचे सर्व प्रादेशिक उपायुक्त व सर्व सहायक आयुक्त उपस्थित होते.






योजनांच्या अंमलबजावणी व प्रसारासाठी कार्यशाळेचे आयोजन करा - राजकुमार बडोले

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळांच्या  योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळांच्या  योजनांच्या आढावा बैठकीत श्री.बडोले बोलत होते.

श्री. बडोले म्हणाले, महामंडळांनी केंद्र व राज्य सरकारच्या निधीचा जास्तीत जास्त लाभ सामान्य जनतेला करुन द्यावा. महामंडळांनी आपल्या खर्चाचे विवरणपत्र तत्काळ सादर करावीत. नाविन्यपूर्ण योजनेची माहिती जनतेला होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावे व शिबिरे आयोजित करावीत. महामंडळांनी आपल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. दुर्बल घटकातील एकही व्यक्ती योजनांपासून वंचित राहू नये याची काळजी महामंडळांनी घ्यावी.




यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ व अन्य महामंडळांचा निधी खर्च व नियोजन संदर्भात आढावा घेतला.

रशियाच्या नवनियुक्त व मावळत्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मॉस्को-मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापाराला चालना


मुंबई, दि. 31 : रशियाचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांच्यासमवेत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची बुधवारी राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.


पुढील वर्षापर्यंत रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग ही दोन मोठी शहरे मुंबईशी थेट विमानसेवेने जोडली जाणार असून त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला चालना मिळेल असे वाणिज्यदूतांनी सांगितले.


रशिया आणि भारत यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असल्याचे नमूद करून संरक्षण, सामरिक सहकार्य, ऊर्जा यांसह विविध क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य आहे. उभय देशांमधील व्यापारसंबंध वाढल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि उभय देशांना त्याचा फायदा होईल असे वाणिज्यदूतांनी सांगितले. आगामी काळात रशियातील विविध शहरांमधून उद्योजकांचे एक मोठे शिष्टमंडळ दिल्ली तसेच मुंबई भेटीवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, पर्यटन विकास आणि फलोत्पादन या क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असून विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी देवाणघेवाण देखील व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांनी त्यांना तीन वर्षाच्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.

खांदा कॉलनी, वागळे इस्टेट एमआयडीसीतील ३७३ कर्मचाऱ्यांना मिळणार स्व मालकीची घरे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खांदा कॉलनी तसेच ठाण्यातील वागळे इस्टेट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी भूखंड देण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे 373 कर्मचाऱ्यांना स्व मालकीची घरे मिळू शकतील.


उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 376 वी बैठक पार पडली. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बल्गन, विकास आयुक्त (उद्योग) हर्षदीप कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
        
यावेळी पनवेल येथील खांदा कॉलनी व ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी भूखंड देण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. खांदा कॉलनीतील एकूण 12 नियोजित सोसायट्यांसाठी तसेच 168 सभासदांसाठी 9 हजार 850 चौरस मीटर क्षेत्र वाटप केले जाणार आहे. तर ठाणे येथील 9 नियोजित सोसायट्यांच्या 205 सभासदांसाठी 9 हजार 710 चौरस मीटर क्षेत्र  राखीव ठेवण्यात आले आहे.


बारवी धरण प्रकल्पबाधित कुटुंबांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने नोकरीऐवजी प्रत्येकी पाच लाख रुपये रोखीने देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.


महापालिकेतर्फे सुलभच्या धर्तीवर एमआयडीसी क्षेत्रात शौचालय संकुल बांधण्यासाठी सुविधा भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशल संस्थेने एमआयडीसी हद्दीत अद्ययावत सुलभ शौचालये उभारणे व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता.

या शिवाय विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण या मागास भागात उद्योग वाढीसाठी भूखंड देताना प्राधान्य देण्याचे धोरण यावेळी मान्य करण्यात आले. त्याचप्रमाणे समूह (क्लस्टर) उद्योग योजना राबविण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

-एमआयडीसी कर्मचाऱ्यांना उपदानाची (ग्रॅच्युइटी) मर्यादा सात लाख रुपयांवरून वाढवून दहा लाख करण्यास मंजुरी.
-पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राजवळील बोरीवली ग्रामपंचायतीच्या पाणी साठवण टाकीसाठी भूखंड मंजूर
-लोटे परशुराम क्षेत्राजवळील धामणगावच्या स्मशानभूमीसाठी भूखंड मंजूर.

रेशनवर मिळणार साखर, चणा व उडीद डाळ - अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 23 लाख प्राधान्य कुटुंबांना प्रतिकुटुंब 1 किलो साखर 20 रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. तर, प्रती शिधापत्रिका चणाडाळ 1 किलो आणि उडीद डाळ 1 किलो किंवा दोन्हीपैकी एक डाळ 2 किलो याप्रमाणे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


श्री. बापट यांनी सांगितले, लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या अन्नधान्य  वाटपासोबत ई पॉसद्वारे साखर घेता येणार आहे. यासाठी राज्यात 39 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 22 हजार 947 क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. या वितरण प्रक्रियेत रेशन दुकानदारांना 1.50 कोटी रुपयांचे कमिशन मिळणार आहे.  चणाडाळ प्रतिकिलो 35 रु. व उडीदडाळ प्रतिकिलो 44 रु. या दराने रेशन दुकानावर उपलब्ध होणार आहे. 


राज्यात माहे नोव्हेंबर 2018 पासून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून अनुदानित दराने  प्राप्त होणाऱ्या  चणाडाळ व उडीद डाळीचे वाटप सुरु होणार आहे. राज्यात सुमारे 25 लक्ष अंत्योदय व 1 कोटी 23 लक्ष प्राधान्य कुटुंबास याचा लाभ मिळणार असून एकूण 7 कोटी 16 हजार लाभार्थी राज्यभरात आहेत.


धान खरेदीस सुरुवात-
राज्यात सन 2018-19 या चालू हंगामात 450 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून त्यापैकी सद्यस्थितीत 114 केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून रु. 200 प्रति क्विंटल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात आले आहे. हंगाम 2016-17 मध्ये प्रोत्साहनपर राशीसाठी रु. 63.50 कोटी व हंगाम 2017-18 करिता रु. 45.78 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.


विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत धान व भरड धान्यांची खरेदी ऑनलार्ईन पद्धतीने करण्यात येते. हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 1 लाख 11 हजार 564 इतक्या शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली आहे.   हंगाम 2016-17 मध्ये शेतकऱ्याकडून सुमारे 610.35 कोटी व हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 400.68 कोटी इतक्या रकमेचे धान खरेदी करण्यात आले.


हंगाम 2014-15 पासून केंद्र शासनाच्या 10 रु. प्रतिक्विंटल या धान भरडाई दरांव्यतिरिक्त 30 रु. प्रतिक्विंटल अतिरिक्त भरडाई दर  राज्य शासनाकडून मंजूर त्यामुळे धान भरडाईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाकडून हंगाम 2016-17 पासून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान हे भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI)  जमा करण्यात येत होते. DCP योजनेअंतर्गत आता थेट राज्य शासनाकडून लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरित करण्यात येते. त्यामुळे धान उत्पादक जिल्ह्यांतील तयार होणाऱ्या तांदळाची  तात्काळ विल्हेवाट लावता येणे राज्य शासनास शक्य झाले आहे. परिणामी यापूर्वी योजना राबविताना होणारा कालापव्यय टाळता आला आहे.


सणासुदीच्या दिवसात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात आपल्याकडे गोडधोड खाद्यपदार्थांची रेलचेल असते. या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेता, हे पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळीचे प्रमाण  वाढण्याची शक्यता असते. या भेसळयुक्त पदार्थामुळे दिवाळीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच खवा, मावा याची आवक बाहेरच्या राज्यातून ट्रॅव्हल्स, रेल्वे यातून होताना आढळून येते म्हणून याबाबत सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. बापट यांनी दिली.
       
श्री. बापट पुढे म्हणाले,  राज्यात दिवाळी व इतर सणानिमित्त भेसळयुक्त बर्फी, खवा/मावा, तेल तूप या अन्नपदार्थावर धाड टाकून हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत 21 हजार 225 कि.ग्रॅ. सुमारे 35 लाख किंमतीचा भेसळयुक्त खवा/मावा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दरम्यान 1 लाख 55 हजार 652 कि.ग्रॅ. सुमारे दीड कोटी किमतीचे भेसळयुक्त वनस्पती तूप/खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे तसेच भेसळयुक्त मिठाई  46 हजार 976 कि.ग्रॅ. याची बाजार किंमत सुमारे 37 लाख 77 हजार 95 जप्त करण्यात आली. प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने अहमदाबाद-गुजरात येथून प्रवासी वाहनातून स्पेशल बर्फी हा अनियंत्रित तापमानामध्ये साठा करुन आरोग्यास घातक अशा परिस्थितीमध्ये साधारण 24 तासापेक्षा जास्त कालावधीत वाहतूक केलेला  होता. यावर कारवाई करुन एकूण 17 हजार 552 कि. ग्रॅ. असा जवळजवळ 31 लाख 82 हजार 432 रुपये एवढया किंमतीची बर्फी जप्त करण्यात आली.
        

धाडीसोबत जनसामान्यांकरिता प्रबोधनाचे कार्य केले जात आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून  ईट राईट इंडिया ही चळवळ नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी स्वास्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे प्रभातफेरी सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा इ. कार्यक्रमाचे संपूण देशात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. स्वास्थ भारत यात्रेतून आरोग्यदायी खा, स्वच्छ खा, निरोगी रहा हा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे. हा स्वास्थ भारत यात्रेचा  शुभारंभ  जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.


भेसळयुक्त पदार्थाच्या माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाने  1800222365 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरिकांना अशा काही भेसळयुक्त पदार्थाची माहिती असल्यास या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही यावेळी श्री.बापट यांनी केले.

सहकारातूनच सहकार क्षेत्र समृद्ध करणार - सहकारमंत्री सुभाष देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राज्य शासनाचे सहकार पुरस्कार प्रदान




मुंबई, दि. 31 : सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल, हे पाहायचे आहे असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृह येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन पटवर्धन, आमदार जयंत पाटील, ॲड.अशिष शेलार, प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, मी मार्गदर्शन नव्हे तर सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्यात सहकार क्षेत्राची ताकद खूप मोठी आहे. जवळपास राज्याची अर्धी लोकसंख्या विविध माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे राज्यात सहकार क्षेत्र अधिक वाढले तर आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध होऊ शकतो ही भूमिका घेऊन सहकार विभाग कार्य करत आहे. आपणास महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून 5 हजार विविध सहकारी संस्थांचे बळकटीकरण करायचे आहे. त्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




काम करताना चूक होते,पण जाणीवपूर्वक वारंवार चुका करू नयेत, असे सांगून श्री. देशमुख यांनी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यात अटल पणन अभियानाचा प्रामुख्याने उल्लेख केला, तसेच राज्यात सहकार रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात किमान जिल्ह्याच्या ठिकाणी हे रुग्णालय सुरू करावे, ज्याचा लाभ गोरगरिबांना होईल, त्यांचा जीव वाचेल असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात कॉपशॉप सुरु करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील सहकारी सोसायट्यांच्या मालकीची मैदाने गोरगरीब शेतकऱ्यांना आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून दिल्यास सोसायटीतील लोकांना ताजा व माफक दरात भाजीपाला व गोरगरीब शेतकऱ्यांना थेट मदत होईल, असे श्री. देशमुख म्हणाले.


सर्व  पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून, त्यांनी उत्तम सोसायट्या व उत्तम कार्य करणाऱ्या संस्थांचा विशेष उल्लेख केला.  राज्यातील उत्तम कार्य केलेल्या संस्थांना सर्वांनी भेट देऊन त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. सहकार क्षेत्र वाढीसाठी सर्व प्रमुख संस्थांच्या संचालकांनी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर किमान एक संस्था काढावी संस्थेचे संस्थापक व्हावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले.


याप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर, जयंत पाटील, आशिष शेलार, शेखर चरेगावकर ॲड.सचिन पटवर्धन यांचीही भाषणे झाली.




कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. चांगले कार्य करणाऱ्यांचे अभिनंदन, कौतुक करावे व इतरांना त्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी आभार प्रदर्शन केले.


या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, दिलीप बनकर, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील तसेच विविध क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


विविध पुरस्कार विजेते

सहकारमहर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. त्यांना 1 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देण्यात आले.


विविध गटांमध्ये सहकारभूषण व सहकारनिष्ठ हे पुरस्कार देण्यात आले. त्याचे स्वरुप सहकार भूषण पुरस्कार 51 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह व सहकारनिष्ठ पुरस्कार 25 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.

गट-1 : प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था :
सहकारभूषण पुरस्कार-पुणे-अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जि.सांगली. कोकण-आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आसुद, जि. रत्नागिरी ; औरंगाबाद-अंधारी विकास सेवा संस्था, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

सहकारनिष्ठ पुरस्कार- नाशिक-शेतकरी विकास सहकारी संस्था, पिंपळगाव, जि.नाशिक.

 गट-2 : नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था :


सहकारभूषण पुरस्कार -कोकण-शिवकृपा सहकारी पतपेढी, मुंबई ; पुणे-शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था, भोसरी, पुणे ;  नागपूर-सेवाश्री साई नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर.


सहकारनिष्ठ पुरस्कार-अमरावती-पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, शिरसगाव कसबा, जि.अमरावती ; औरंगाबाद-औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, औसा, जि.लातूर.

गट-3 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका :

सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.लातूर.


गट-4 : नागरी सहकारी बँका :
सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-वैश्य नागरी सहकारी बँक म. परभणी ; कोल्हापूर- दि कोल्हापूर अर्बन को-ऑप.बँक लि., कोल्हापूर ; कोकण-चिपळूण अर्बन को-ऑप.बँक लि., चिपळूण, जि.रत्नागिरी.


सहकारनिष्ठ पुरस्कार-नाशिक-श्री स्वामी समर्थ सह.बँक मर्या., निघोज, पारनेर, जि.अहमदनगर.


गट-5 : सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दूध संघ :
सहकार भूषण पुरस्कार-साखर कारखाने-श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या.भेंडा बु. नेवासा, जि.अहमदनगर ; सूतगिरणी-चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, हातकणंगले, जि.कोल्हापूर ; दूधसंघ-राजाराम बापू सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., इस्लामपूर, जि.सांगली.


सहकारनिष्ठ पुरस्कार-दूधसंघ-पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., पुणे.


गट-6 : गृहनिर्माण सहकारी संस्था :
सहकार भूषण पुरस्कार-मुंबई-श्री श्रद्धा माता को.ऑप.हौसिंग सोसायटी, पवई, मुंबई-76 ; मुंबई-साई शिल्प को.ऑप.हौसिंग सोसायटी, मुलुंड पूर्व, मुंबई.


सहकारनिष्ठ पुरस्कार-कोकण- नवमिलन को.ऑप.हौसिंग सोसायटी लि., डोंबिवली (पूर्व), जि.ठाणे ; पुणे-रविराज सहकारी गृहरचना संस्था मर्या., वारजे, पुणे ; अमरावती-डॉ.पंजाबराव देशमुख गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., अमरावती.


गट-7 : औद्योगिक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था :
सहकारभूषण पुरस्कार-औद्योगिक संस्था-सिद्धार्थ बिडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या., पिंपळगाव, जि.भंडारा; पाणीपुरवठा-कै.अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था मर्या., व्हनाळी, साके केनवडे, जि.कोल्हापूर.

सहकारनिष्ठ पुरस्कार-इतर-आर्म्ड फोर्सेस एक्स ऑफिसर्स मल्टीसर्व्हीस को.ऑ.सोसायटी लि., 364, गोखले रोड, मॉडेल कॉलनी, पुणे-16.


गट-8 : फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था :
सहकारभूषण पुरस्कार-खरेदी विक्री-चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ लि., तुर्केवाडी, चंदगड, जि.कोल्हापूर ; प्रक्रिया-सिंदेवाडी सहकारी भातगिरणी संस्था मर्या., सिंदेवाडी, जि.चंद्रपूर.

सहकारनिष्ठ पुरस्कार-ग्राहक संस्था-उमरखाडी कन्झ्युमर्स को.ऑप.सोसायटी लि., डोंगरी, मुंबई-09.        

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 :  महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अशी ठेवण्यात आली आहे.


अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.


सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर 2018 पूर्वी सादर करावी.


याबाबत अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 16 ऑक्टोबर 2017, शासन शुद्धीपत्रक 8 डिसेंबर 2017 आणि शासन शुद्धीपत्रक 24 ऑक्टोबर 2018  चे अवलोकन करावे.


अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

रेडीतील महिलांना शेतीचा ध्यास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


आज महिला अवकाश यानापासून वैमानिक, लष्करात तसेच अगदी रेल्वे इंजिन चालकापर्यंत सर्वच क्षेत्रात हिरिरीने कार्य करताना दिसत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा निर्माण करून 'हम भी कुछ कम नही' याचं प्रत्यंतर देत आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील हरितक्रांती गटातील महिलांनी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने भात लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. चांदा ते बांदा अंतर्गत कृषी व आत्मा विभागाच्या सहयोगाने त्यांनी तीन एकर क्षेत्रावर रत्नागिरी 24 या भाताची यशस्वी लागवड केली आहे. सिंधुदुर्ग व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी शासनाने चांदा ते बांदा ही महत्वाकांक्षी व अभिनव अशी योजना सिंधुदुर्गात राबविली आहे. या अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेतून भात लावणी यंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टीलर आदी यंत्रे पुरविली जातात.




रेडी गावात हरितक्रांती महिला बचत गट आहे. चित्रा कानयाळकर, विद्या नाईक, अंकिता गावडे यांच्यासह एकूण 11 महिलांनी हा बचतगट स्थापन केला आहे. नेहमीची म्हणजे केवळ लोणची, पापड अशा खाद्य पदार्थांची निर्मितीची वाट न चोखाळता त्यांनी शेतीचा ध्यास धरून वेगळी वाट चोखाळली आहे. या गटाकडे स्वतःची जमीन नव्हती, त्यांनी गावातीलच तीन एकर शेती भात लागवडीसाठी भाडेतत्वावर घेतली. या तीन एकरात कृषि विभागाकडून उन्नत शेती अंतर्गत मोफत भात बियाणे मिळाले. चांदा ते बांदा अंतर्गत कृषी विभाग व आत्माच्या सहयोगाने ट्रॅक्टर, भात लावणी यंत्र मिळाले. तरवा तयार करून रोपांची निर्मिती झाली. आत्माच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. 'अनुगामी लोकराज्य महाअभियान'चे अमित नाईक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.

गेली 20 वर्षे पडिक असणाऱ्या जमिनीवर हरितक्रांतीच्या महिलांनी रत्नागिरी-24 भात रोपांची भात लावणी यंत्राच्या सहाय्याने यशस्वी केली आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. बचत गटातील या महिलांनी कृषि क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी असते हे सिद्ध केले आहे. कृषि विभागाच्या तांडेल मॅडम, कृषि मित्र सिताराम राणे यांनी या महिलांना भात लागवडीबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.


- मिलिंद बांदिवडेकर,

जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार - विनोद तावडे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी



मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 नुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगडोह समितीच्या शिफारशी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.


आज मंत्रालयात विद्यार्थी निवडणुकासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. तावडे यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ निवडणुकासंदर्भातील माहिती दिली.


श्री. तावडे यांनी सांगितले, विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम 31 जुलैपूर्वी घोषित करण्यात येईल आणि शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबरपूर्वी विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठित करण्यात येईल. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठीची व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक सरळ बहुमताच्या तत्वानुसार घेण्यात येईल. संबंधित विद्यापीठामध्ये विद्यापीठ विभाग तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. ही प्रक्रिया दरवर्षी कालबद्ध पध्दतीने व कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळून राबविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषद यांच्या निवडणुकीच्या बाबतीत मतमोजणी आणि निकालाची घोषणा मतदानाच्या दिवशीच करण्यात येईल.


निवडणू‍क लढविण्याकरिता विद्यार्थ्याने महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पूर्ण वेळ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने मागील कोणताही विषय शिल्लक न ठेवता किंवा सत्र पुढे चालू ठेवण्याची मुभा न घेता अगोदरच्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी एकाच वर्गात पुन:प्रवेश घेतलेला नसावा तसेच निवडणुका लढविण्यासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादाही त्या शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.

शिधापत्रिकेशिवायही मिळेल लोह व आयोडीनयुक्त मीठ - अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
गिरगाव येथे नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप



मुंबई, दि. 31 : नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्त भाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातील सामान्य नागरिकांनासुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.


गिरगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ सभागृह येथे नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार आदी उपस्थित होते.


श्री. बापट म्हणाले, मीठ हे सकस अन्नघटक असून आरोग्यासाठी आयोडीनयुक्त मीठ आवश्यक असते. भारतातील आरोग्य सर्व्हेनुसार 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना  सामोरे जावे लागते. त्यामुळेच लोह व आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रतिकिलो 14 रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


नागरिकांना आयोडीन व लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमिया, इतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्यत्वे महिला व लहान बालके यांचा समावेश असतो. आहारातील लोह व आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात डबल फोर्टिफाईड शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
      


राज्यात जुलै महिन्यात नागपूर येथून आयोडिनयुक्त मीठ वाटप सुरुवात झाली असून राज्यात आतापर्यंत 3 लाख कुटुंबांनी या आयोडिनयुक्त मीठाची मागणी केली आहे. डबल फोर्टिफाइड मीठ बाजारात 24 ते 25 रु. प्रतिकिलो या दराने विकले जाते परंतु शिधावाटप दुकानामध्ये हे 14 रु. किलो दराने मिळणार आहे यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 2022 सालापर्यंत ॲनिमियामुक्त भारत हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ शपथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई दि. 31 : भारताचे पहिले उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ दिली.



या कार्यक्रमास आमदार प्रतापराव चिखलीकर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


सचिन गाढवे/वि.सं.अ./31 ऑक्टोबर 2017