देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दल अभिमान : डॉ.सुभाष भामरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

धुळे येथे शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोज
धुळे, दि. २९  :  आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्राणपणाने रक्षण करणारा, आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावून जाणारा, देशाचा शूर सैनिक ही आपल्या सर्वांसाठी आदराची आणि अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज केले.

शौर्य दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ.भामरे बोलत होते. यावेळी मेजर जनरल अजय पॉल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, कॅप्टन विद्या रत्नपारखी, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे रामदास पाटील यांच्यासह वीर माता, वीर पत्नी व माजी सैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.भामरे म्हणाले, परकीय शक्तींपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य राखून आपल्या पाठीशी भक्कमपणे अहोरात्र उभे राहणाऱ्या या सैनिकांचे आपल्यावर फार मोठे ऋण असते. देशरक्षणासाठी सीमेवर चोवीस तास तैनात राहणाऱ्या सैनिकांमुळेच सर्व भारतीय नागरिक हे आपल्या कुटुंबियांसमवेत सुखाची झोप घेत असतात. या शौर्य दिनांच्या प्रसंगी सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फत शौर्य दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.मेजर जनरल अजय पॉल यावेळी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक म्हणजे इतर कोणत्याही भागाला इजा न पोहोचविता केवळ ठराविक भागावर करण्यात येणारी पद्धत असून यानुसार २९ सप्टेंबर, २०१६ रोजी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त भागात केलेली कारवाई अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर यापुढेही आवश्यकता भासल्यास अशा प्रकारची कारवाई करण्यास भारतीय सैन्यदल तत्पर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सर्वप्रथम कॅप्टन श्रीमती रत्नपारखी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत २९ सप्टेंबर, २०१६ रोजी झालेल्या सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  डॉ.भामरे यांच्या हस्ते उपस्थित वीर माता व वीर पत्नी यांच्यासह माजी सैनिकांचा सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा