लातूर -उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतलातूर, दि.३० :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्लारी येथे दिला.

महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, खासदार, प्रा. रविंद्र गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री  डॉ.पदमसिंहजी पाटील, माजी मंत्री तथा आमदार  मधुकरराव चव्हाण, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील, सर्वश्री आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, सुरेश धस, लातूर जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी खासदार गोपाळरावजी पाटील, जनार्धन वाघमारे, रुपाताई निलंगेकर, कल्पना नरहिरे, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, संजय कोलते, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर. राजा उपस्थित होते .

प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील व इतर मान्यवरांनी भारतीय जैन संघटनेकडून  जलयुक्त शिवारच्या कामासाठी देण्यात येणाऱ्या मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन निर्धार समारंभाची सुरुवात झाली.

१९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून या वेळी आपलं सर्वस्व गमावलेल्या लोकांसोबत संवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्या आपत्तीच्या परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांनी चांगले काम केले होते, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी पुनर्वसनाचे मोठे काम करण्यात आले. परंतु त्याबाबतचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यापैकी कुटुंबामध्ये झालेल्या वाढीव सदस्यांमुळे त्यांना आवश्यक असेल तर घर किंवा जागा देण्यात येईल त्याचबरोबर त्यावेळी पुनर्वसनासाठी जमिनी दिलेल्या लोकांनाही जागा अथवा इतर मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविल्या जात होत्या, या भागाचे पुनर्वसन होत असतानाही येथेही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला परंतु काही कारणांनी या योजना बंद झाल्या. त्या सर्व योजना पुन्हा सौरऊर्जेच्या मदतीने कार्यान्वित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या भूकंपामुळे अनेक गावात पुनर्वसनाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली . या गावांपैकी काही कामे प्रलंबित आहेत.पुनर्वसनानंतर अजूनही काही प्रश्न शिल्लक आहेत. त्यातील या भागातील ज्या कुटुंबांना आवश्यक असेल त्या कुटुंबांना घर अथवा प्लॉट देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली . तसेच या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत . त्या या सोलापूरच्या सोलर उर्जेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याची घोषणाही त्यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील नदी, नाले, तलाव, धरणातील गाळ काढणे व इतर जलसंधारणाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केल्यास कमीत कमी पावसातही गावे जलपरिपूर्ण होऊ शकतात. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाला परंतु जलयुक्तच्या कामांमुळे पिकांना संरक्षित सिंचन मिळाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या कामांमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पाणी पातळीत किमान चार मीटरने वाढ झालेली आहे तर या भागातील टॅंकरची संख्या ८५ टक्‍क्‍याने कमी होऊन टंचाईग्रस्त गावांची संख्याही ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

श्री.फडणवीस म्हणाले की,भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करून या जिल्ह्यातील गावे जलयुक्त व दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीचा निर्धार करताना या भागातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे ,उसाचे पीक महत्त्वाचे  असले तरी इतर पिकांचाही विचार झालाच पाहिजे तरच गावे दुष्काळमुक्त होतील. किल्लारी येथील कारखानाही लवकरच सुरू होईल असे सांगून पालकमंत्री निलंगेकर यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या काही भागात केलेल्या जलसंधारणाच्या  कामाचे कौतुक केले.

श्री.फडणवीस यांनी राज्य शासनाच्या जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल तसेच भारतीय जैन संघटनेच्या दुष्काळमुक्तीच्या कामात शासन, प्रशासन व लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले तर सद्यस्थितीमध्ये पावसाअभावी पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे परंतु  शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या  पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविक करताना मागील चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. येथील भूकंपाने एक पिढी नष्ट केली तर दुसरी पीढी उद्ध्वस्त होऊ  नये  म्हणून किल्लारी गावातील निराधार मुलांना भारतीय जैन संघटनेमार्फत  पुणे येथे पुढील शिक्षणासाठी  नेण्यात  आले,  त्यांना चांगले शिक्षण मिळाल्याने आज ते शासकीय तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी दिली. लातूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात जलसंधारणाची  विविध कामे पूर्ण करुन हे दोन्ही  जिल्हे  दुष्काळमुक्त  करण्याचा निर्धार भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाने केलेला आहे.  १५ जून २०१९ पर्यंत  हे जिल्हे दुष्काळमुक्त  करण्यासाठी  आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच  लातूर जिल्हयाचे तत्कालीन   जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना संकट काळात समाजाची त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती वाढविण्याची गरज आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपाने संकटकाळात त्यावर मात करण्याची शक्ती वाढविण्याबरोबरच माझ्या आयुष्यातही खूप काही शिकण्याची संधी मला मिळाली, असे सांगून त्यांनी शासन व प्रशासनाने भूकंपानंतरच्या काळात केलेल्या कामांची तसेच आपत्तीव्यवस्थापनासंबंधी राबविलेल्या  विविध उपाययोजनांची माहिती दिली.

लातूर,उस्मानाबाद या जिल्ह्यात २५ वर्षापूर्वी भूकंपाने मोठं नुकसान झालं पण लोकांनी उभारी घेतली. राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु करून  राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला व कामात आमचाही पूर्ण सहभाग आहे व येथून पुढेही राहील असे आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले.

लातूर व उस्मानाबाद  या दोन्ही  जिल्ह्यात भारतीय  जैन संघटना व महाराष्ट्र सेना यांच्यामार्फत जलसंधारणाची विविध कामे करून पाणी अडविणे व जिरविणे ही कामे होणार असल्याने हे  दोन्ही  जिल्हे  दुष्काळमुक्त होऊन जलपरिपूर्ण  होतील, असा विश्वास व्यक्त करुन  उस्मानाबादचे  पालकमंत्री  अर्जुन खोतकर  यांनी शांतीलालजी मुथा यांना जलयुक्त  शिवार मधील मानद डॉक्टरेट पदवी दयावी असे सूचविले.

लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी येथे झालेल्या भूकंपाने भयानक परिस्थिती निर्माण झालेली होती. या संकटावर मात करण्यासाठी विविध संघटनांनी येथे कार्य केले त्यातील बीजेएस  या संघटनेनेही येथील बाराशे विद्यार्थ्यांना पुणे  येथे नेऊन तेथे त्यांचे शिक्षण पूर्ण करुन त्यांचे पुढील जीवन सुकर केले, असे कौतुकाने म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नुकताच  मराठवाड्याने आपला ७० वा  मुक्तीदिन साजरा केला. मागील ७० वर्षाच्या काळातही मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.  या भागावर त्याकाळी  निजामाचे संकट, भूकंपाचे संकट त्यानंतर मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याचे संकट अशी विविध संकटे येत आहेत.  सन २०१६ साली या भागात रेल्वेने पाणी आणावे लागले.  लातूर जिल्ह्यात साडेसहाशे टँकरची संख्या होती.  मराठवाड्याच्या  इतर जिल्ह्यातही  मोठ्या प्रमाणात टँकरची  संख्या होती.  परंतु मागील तीन-चार वर्षात  लातूर जिल्हा व मराठवाड्यात  झालेल्या जलयुक्तच्या कामांमुळे या भागातील टँकरची संख्या लक्षणीय कमी झाली असून लातूर जिल्हा टँकरमुक्त झालेला आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

आजही मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे व या भागात  दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. या भागात जवळपास 70 टक्के सोयाबीनची लागवड होते,  परंतु हे पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेलेले आहे.  त्यामुळे या भागावर दुष्काळाची छाया पडलेली दिसत आहे.  मुख्यमंत्र्यांनी या बाबीचा विचार करावा, अशी विनंतीही पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच मराठवाड्यासाठी  समृद्धी महामार्ग हा वरदान ठरलेला आहे. हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून जात आहे परंतु हा महामार्ग औरंगाबाद येथून बेंगलोर -हैदराबादकडे जर करण्यात आला तर या भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल  त्याबाबतचाही  विचार व्हावा  अशी  मागणीही   त्यांनी केली.

पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला जनता कधीही विसरणार नाही, असे माजी केंद्रीय  मंत्री शिवराज पाटील -चाकूरकर  यांनी सांगून  अडचणीच्या  काळात सर्वजण  जात-धर्म पक्षभेद विसरून एकत्रपणे काम करतात ते  या भूकंपाच्या वेळी  दिसून आले.  भूकंपाची आपत्ती  आली  त्यावेळी देशात व राज्यात आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरण अस्तित्वात नव्हते.  परंतु या भूकंपामुळे देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाची  स्थापना  झाली, अशी  माहिती  त्यांनी  दिली. मानवी जीवनासाठी हवा, पाणी, अन्न  हे महत्वाचे घटक असून जलसंधारणाच्या  या  कार्यास सर्वांनी  एकत्रित येऊन काम  करावे , असे आवाहन  त्यांनी  याप्रसंगी  केले.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या मनोगतात ३० सप्टेंबर १९९३  रोजी झालेल्या भूकंपाची  माहिती घेतल्यानंतर तातडीने सकाळी सात वाजता किल्लारी येथे पोहोचलो .यावेळी प्रथम काम केले ते मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अंत्यविधी करणे व दुसरे काम केले ते जखमी लोकांना तत्काळ  उपचार मिळवून देणे , अशा आठवणी  सांगितल्या.या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: येथे उपस्थित राहून येथील मदतकार्याच्या कामाला शिस्त लावली. त्यानंतर दहा दिवसात येथील लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून एका महिन्याच्या आत सर्वांना शेडचे घर उपलब्ध करून दिले. भूकंपाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने व इतर संघटनांनी जेवढी मदत केली तेवढेच मदतकार्य या भागातील लोकांनीही केले होते . या धक्क्यातून बाहेर पडण्याचे काम याच लोकांनी केल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली.

श्री.पवार यांनी सांगितले, या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या या भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी मुंबईवरून राज्यातील इतर तीस-पस्तीस मानसोपचारतज्ज्ञाची टीम तेथे सतत तीन महिने कार्यरत होती. यावेळी केंद्र शासन व जागतिक बँकेने मोठे आर्थिक सहकार्य केले. गावच्या सरपंचांनी कसे काम करावे, हे तत्कालीन किल्लारीचे सरपंच असलेले शंकरराव पडलेकर यांच्या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येते. शेवटी श्री.पवार यांनी राज्य शासन व भारतीय जैन संघटना उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्ह्यात जलसंधारणाचे काम हाती घेत आहे. हे काम करण्यापूर्वी त्यांनी जलतज्ञांचा सल्ला घ्यावा व नंतरच कामाला सुरुवात करावी, असे सांगून या कामात सर्वांचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

भूकंप झाल्यानंतर या भागातील निराधार बाराशे विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेने त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पुणे येथे नेले,त्यांचे पूर्ण पालकत्व स्वीकारले, त्याबाबतची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

यावेळी भारतीय जैन संघटना व त्यांचे  पदाधिकारी तसेच किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच शैलाताई लोहार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फोटो फ्रेम देऊन सत्कार केला. या समारंभाचे सूत्रसंचालन सुनील कोचेटा व  प्रकाश दगडे यांनी केले तर आभार अभय शाह व  किल्लारी गावचे उपसरपंच अशोक पोतदार यांनी मानले.

किल्लारीत १९९३ च्या भूकंपात मृत्यू पावलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


लातूर,दि.३०- किल्लारी गावात १९९३ च्या भूकंपातील मृतात्म्यांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी खासदार रवींद्र गायकवाड, खासदार सुनील गायकवाड, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, लातूर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे देण्याचे काम डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करणार - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
शिर्डी, दि. 30:- राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर 2018 अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.  यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयचे माजी राज्यपाल रंजीत शेखर मुशाहारी, महंत रामगिरीजी महाराज, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे, स्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश कोते, पद्मश्री लक्ष्मीकुटी अम्मानिलीमा पट्टे, डॉ. दासरी श्रीनिवासन, लक्ष्मणराव टोकले, कमलचंद भजदेव आदी उपस्थित होते.श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी  समाजाला सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजाने आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला असून ब्रिटीशांच्या आक्रमणानंतरही त्यांनी आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांच्या काळात आदिवासी बांधवांनी पराक्रम गाजविला. जल, जमीन आणि जंगलाच्या अधिकारासाठी बिहारमधील तिखामाजी, महाराष्ट्रातील बाबुराव शरमाके, बिरसा मुंडा आदींनी अपार साहस दाखवले, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.देशात विविध भाषा, परंपरा आहेत. मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले. त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला. त्यामुळे विविध क्रीडा प्रकारात या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसतात, असेही ते म्हणाले.

डॉ. मुशाहिरी यांनी देशातील विविधता हे वैशिष्ट्य असल्याचे सांगत आदिवासींनी ही परंपरा जोपासल्याचे सांगितले. जातीभेद विसरुन सर्वांनी मानवधर्माचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. श्री. ओराम यांनी आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा, त्याच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु असल्याचे सांगितले.


यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  श्री. कोते यांना प्रास्ताविकात अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे हे संमेलन इतिहासातील सर्वांत मोठे संमेलन आहे, असे सांगितले.

श्री. हावरे यांनी यावेळी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार, रक्तदानासारखे उपक्रम, साईसेवक योजना आदी उपक्रम राबविले असल्याची माहिती दिली.

गेल्या वर्षी वनवासी कल्याण आश्रमाद्वारा भोपाळ येथे  आयोजित तिरंदाजी स्पर्धेत एकावेळी  306 तिरंदाजांचा समावेश होता. या विक्रमाची नोंद  गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र आशिया विभागाचे प्रमुख मनीष बिष्णोई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण आश्रमांच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात आले.


तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, राहाताच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा आदींची उपस्थिती होती.

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिडांगणे विकसित करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप


नागपूर, दि. 29 : नागपूर शहराला महान खेळाडू, क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षकांची उज्ज्वल परंपरा लाभली असून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारी क्रीडांगणे विकसित करण्यात येणार असल्याचे तसेच यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


कविवर्य सुरेश भट सभागृह येथे खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी महापौर अटलबहादूर सिंग, माजी महापौर कुंदाताई विजयकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.


यावेळी नागपूरचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नागपूर क्रीडा महर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळाच्या माध्यमातून सुदृढ व निकोप समाजाची निर्मिती होत असून खेळामुळेच खिलाडूवृत्ती व चिकाटी निर्माण होते. नागपूर शहराला नामवंत खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांची उज्वल परंपरा लाभली असून नागपूर क्रीडानगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी यश मिळविण्यासाठी नागपुरातील क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक अथक परिश्रम घेत आहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही देशातील खेळाडूंनी दर्जेदार प्रदर्शन केले. हे सर्व खेळाडू ग्रामीण भागातून पुढे आलेले व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपले स्वप्न पूर्ण केलेले खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंनी देशाचा गौरव वाढविला आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर येथे भव्य क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी निश्चितच गौरवास्पद आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. साईसह मानकापूर तसेच शहर व जिल्ह्यातील विविध क्रिडांगणे विकसित करुन ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यावर भर देण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले, कला, शिक्षण, संस्कृती तसेच क्रीडा यासह समाजातील सर्वच क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत असून याअंतर्गतच खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांनी उत्साहाने सहभाग घेतला व सहकार्य केले व हा क्रीडा महोत्सव यशस्वी केला. नागपूर शहर व जिल्ह्यात अनेक क्रीडांगणे असून या क्रीडांगणांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून याअंतर्गत  साईचे अत्याधुनिक सुविधा असणारे मोठे क्रीडा प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे उभारण्यात येत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठीही विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात अटलबहादूर सिंग यांचे योगदान अतुलनीय असल्याचे गौरवपूर्ण उद्गारही श्री.गडकरी यांनी काढले.


यावेळी   विजय मुनीश्वर – पॅराऑलम्पिक, संजय (भाऊ) काणे - ॲथलेटिक्स, सलिम बेग – फुटबॉल, सी.डी.देवरस – बॅडमिंटन, सितारामजी भोतमांगे – कुस्ती, एस.जे.अँथोनी – मॅरेथॉन, लखिरामजी मालविय – जलतरण, बळवंत देशपांडे (बाबा) – स्केटिंग, यशवंत रामू चिंतले (गुरुजी) – कॅरम, त्रिलोकीनाथ सिध्रा – हॉकी, अरविंद गरुड – बॉस्केटबॉल, डॉ.विजय दातारकर – खो-खो, शरद नेवारे – कबड्डी, अनुप देशमुख – बुद्धीबळ, डॉ.दर्शन दक्षिणदास –लॉन-टेनिस, दिनेश चावरे – बॉडी बिल्डिंग, सुनील हांडे – व्हॉलीबॉल, अविनाश मोपकर – टेबल-टेनिस, अनिरुद्ध रईच – सायकलिंग, सुहासिनी गाडे – महिला क्रिकेट या क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. पुढील वर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन 12 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. आभार माजी महापौर प्रवीण दटके यांनी मानले.


'वनामती'च्या दोन माहिती पुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
यावेळी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनामती) नागपूर या संस्थेत Agribusiness Incubation Centre व कृषी उत्पादन निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण असे दोन नवीन उपक्रम सुरु करण्यात  येत आहेत. या  उपक्रमाबाबतच्या दोन माहिती पुस्तिका तयार करण्यात आल्या. त्या पुस्तिकांचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांची उपस्थिती होती.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला पुण्यात 'ज्येष्ठोत्सव-२०१८' चे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.29 : महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग व ॲस्कॉप संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दि.1 ऑक्टोबर रोजी पुणे येथे 'ज्येष्ठोत्सव-2018' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 वाजता शुभारंभ लॉन्स, डी.पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, येथे हा कार्यक्रम होणार आहे.


राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली व पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय ‍शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार अनिल शिरोळे, स्थानिक आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये, शां.ग. महाजन, अभिनंदन थोरात, प्रतिभा शाहू मोडक, माधव वझे, सुधीर गाडगीळ, विश्वास मेहंदळे, डॉ. मोहन आगाशे, माजी एअर चीफ मार्शल श्री. भूषण गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण, विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलिओ लसीत व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये; महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 29 : गाझियाबादमधील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाईप टू व्हायरस आढळल्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसींचा वापर दि. 11 सप्टेंबर 2018 पासून राज्यात थांबविण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.


यासंदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी सांगितले कीपोलिओ निर्मूलनासाठी दोन प्रकारे लसीकरण केले जाते. एक इंजेक्शनद्वारे आणि दुसरे तोंडावाटे. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. ते संबंधित आजाराविरुद्ध लढण्याची ताकद शरीरात निर्माण करतात,  असे स्पष्ट करत आरोग्यमंत्री म्हणाले कीकेंद्र शासनातर्फे दि. 10 सप्टेंबर 2018 रोजी या कंपनीच्या व्हॅक्सिनचा वापर न करण्याबाबतच्या सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या असून दि. 11 सप्टेंबरपासून त्याचा वापर राज्यात बंद झाला आहे. पोलिओ लसीकरणात 2016 पर्यंतच टाईप टू व्हॅक्सिनचा वापर करण्यात आलेला आहे. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईलअसे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या संदर्भातील शासन निर्णय दि. आज निर्गमित करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत मुद्दल व व्याजासह रु. 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement) योजनेखाली  पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2018 ते दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे.


राज्यामध्ये सन 2009-10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दि. 24 जून 2017 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय दि. 28 जून 2017 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ समझोता योजनेत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत बँकेत जमा करण्यास मुदत देण्यात आली आहे. सदरची मुदत दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आहे.
000
वि.सं.अ.पाटोदकर/29.09.18

नैसर्गिक आपत्तीप्रसंगी निधी उभारणीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश


मुंबई दि. 29 : नैसर्गिक आपत्तीप्रसंगी निधी उभारणीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या संयोजनाखाली मंत्रिगटाची स्थापना केली असून यामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.


शुक्रवारी वस्तू आणि सेवा कर परिषदेची ३० वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा मंत्रिगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे अधिकृत पत्रक केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने दि. २८ सप्टेंबर २०१८ रोजी निर्गमित केले आहे.


या मंत्रिगटात श्री. मुनगंटीवार यांच्याबरोबर आसामचे वित्तमंत्री हेमंता बिस्व सर्मा, केरळचे वित्तमंत्री डॉ. टी.एम.थॉमस इसाक, ओडीसाचे अर्थमंत्री शशीभूषण बेहरा, पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंह बादल आणि उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.


हा मंत्रिगट अनेक विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करेल. यामध्ये  राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत राज्यांना आपत्ती निवारण आणि मदत कार्यासाठी देण्यात येणारा निधी पुरेसा आहे किंवा कसे, वस्तू आणि सेवाकराच्या माध्यमातून यासाठी काही पूरक पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे किंवा कसे, असल्यास ती कशा स्वरूपात असावी, अतिरिक्त कर असावा किंवा उपकर (सेस) लावावा, हा उपकर विशिष्टपणे राज्यासाठी लागू असावा किंवा देशभरात त्याची अंमलबजावणी व्हावी,  राज्यांना आपत्ती निवारणासाठी मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी द्यावयाचा झाल्यास असा निधी मिळण्यास पात्र होण्यासाठी  उद्भवणाऱ्या परिस्थिती कोणत्या असाव्यात, सध्याच्या वस्तू आणि सेवा कर कायद्यातील तरतुदीमधून ते करणे  (वस्तू आणि सेवा कर आपत्ती निवारण निधी उभारणे)  शक्य आहे का, किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्ती म्हणून पात्र ठरलेल्या विशिष्ट घटनेसाठी असा निधी उभारता येईल, याची संकलनाची पद्धत काय असावी अशा विविध विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांवर अभ्यास करून हा मंत्रिगट दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपला अहवाल सादर करेल असेही वस्तू आणि सेवा कर परिषदेने निर्गमित केलेल्या मंत्रिगटाच्या स्थापनेच्या पत्रकात नमूद केले आहे.

दिलखुलास' कार्यक्रमात सोमवारी अशोक चौसाळकर, अरुण खोरे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात  महात्मा गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक अशोक चौसाळकर आणि लेखक तथा अभ्यासक अरुण खोरे यांची 'महात्मा गांधीजींचे विचार व कार्य' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. १ आणि  मंगळवार दि. २ ऑक्टोबर  रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५० वी जयंती निमित्त विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. गांधीजींच्या जीवनातील अजरामर तत्वे, त्यांचे कार्य, मूल्ये आणि साहित्य तसेच गांधीजींचे विचार आणि तत्वांचा वारसा पुढे नेण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांचे प्रयत्न याबाबत श्री. चौसाळकर आणि श्री. खोरे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

स्वामी विवेकानंदांचे विचार आजही समर्पक - राज्यपाल चे ‍विद्यासागर राव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : स्वामी विवेकानंदांचे विचार आजही समर्पक आहेत. त्यांनी सांगितलेल्या तत्वांची अंमलबजावणी होण्यासाठी शाळा, कॉलेजमधून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होणे गरजेचे असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज सांगितले. शिकागो येथील धार्मिक संसदेत स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण मिशनद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


राज्यपाल म्हणाले, आज एकशे पंचवीस वर्षांनंतरही स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक समर्पक आहेत. देशाच्या काही भागांमध्ये जाती, पंथ, प्रदेश आणि धर्माच्या मार्गावर भारताला विभाजित करू इच्छिणाऱ्या काही प्रवृत्ती तसेच नक्षलवादी आपले कुरूप डोके वर काढत आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर असहिष्णुता वाढत आहे. देशाची भावनात्मक ऐक्य आणि अखंडता राखण्यासाठी विवेकानंदांच्या कल्पनांना समजावून घ्यावे लागेल.

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अवलंब करून भारतातीलच नव्हे तर जागतिक समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात यावी यासाठी रामकृष्ण मिशनने पुढाकार घ्यावा. तसेच शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी कल्याण क्षेत्रातील रामकृष्ण मिशन मुंबईच्या विविध उपक्रमांविषयीही त्यांनी गौरोवोद्गार काढले. आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रमुख संस्थांमधील तरुणांना यात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

स्वामी विवेकानंदांच्या विचारावर बोलताना राज्यपालांनी सांगितले, स्वामी विवेकानंदानी  युवा सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण या दोन गोष्टींवर भर दिला होता. आज भारत जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. 2020 पर्यंत, भारतीय सरासरी वय 29 वर्षे होईल, अमेरिकन किंवा चीनीपेक्षा जवळजवळ 8 वर्षे लहान असेल. या युवा पिढीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. युवकांना शिक्षण व कौशल्यासह सशक्त बनविण्यासाठी, रामकृष्ण मिशन सारख्या संस्थांनी युवकांमध्ये समाजाची आणि देशाची सेवा करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे.


महिलांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही असा विश्वास विवेकानंदांनी व्यक्त केला होता. ज्या देशांमध्ये स्त्रियांचा आदर नाही, ते कधीही मोठे झाले नाहीत आणि भविष्यात कधीही होणार नाहीत, असेही विवेकानंद म्हणत. आपण आपल्या समाजातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे. यासाठी सर्व स्तरांमधून जागरूक प्रयत्न झाले पाहिजेत, असे राज्यपालांनी आवर्जून सांगितले.मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाला रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, बेलूर मठाचे अध्यक्ष  स्वामी सत्यदेवनंद, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, मुंबईचे सचिव स्वामी कृष्णनंदजी महाराज यांचीही भाषणे झाली. यावेळी  रामकृष्ण मठ आणि मिशनचे स्वामीजी, विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे धार्मिक नेते स्वामी रामकृष्ण यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दल अभिमान : डॉ.सुभाष भामरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

धुळे येथे शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोज
धुळे, दि. २९  :  आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्राणपणाने रक्षण करणारा, आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावून जाणारा, देशाचा शूर सैनिक ही आपल्या सर्वांसाठी आदराची आणि अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज केले.

शौर्य दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ.भामरे बोलत होते. यावेळी मेजर जनरल अजय पॉल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, कॅप्टन विद्या रत्नपारखी, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे रामदास पाटील यांच्यासह वीर माता, वीर पत्नी व माजी सैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.भामरे म्हणाले, परकीय शक्तींपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य राखून आपल्या पाठीशी भक्कमपणे अहोरात्र उभे राहणाऱ्या या सैनिकांचे आपल्यावर फार मोठे ऋण असते. देशरक्षणासाठी सीमेवर चोवीस तास तैनात राहणाऱ्या सैनिकांमुळेच सर्व भारतीय नागरिक हे आपल्या कुटुंबियांसमवेत सुखाची झोप घेत असतात. या शौर्य दिनांच्या प्रसंगी सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फत शौर्य दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.मेजर जनरल अजय पॉल यावेळी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक म्हणजे इतर कोणत्याही भागाला इजा न पोहोचविता केवळ ठराविक भागावर करण्यात येणारी पद्धत असून यानुसार २९ सप्टेंबर, २०१६ रोजी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त भागात केलेली कारवाई अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर यापुढेही आवश्यकता भासल्यास अशा प्रकारची कारवाई करण्यास भारतीय सैन्यदल तत्पर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सर्वप्रथम कॅप्टन श्रीमती रत्नपारखी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत २९ सप्टेंबर, २०१६ रोजी झालेल्या सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  डॉ.भामरे यांच्या हस्ते उपस्थित वीर माता व वीर पत्नी यांच्यासह माजी सैनिकांचा सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी मानले.