पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे बबनराव लोणीकर यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 28 : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.


पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. लोणीकर बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल मनपाचे सभागृह नेता परेश ठाकूर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगरपालिकेचे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.


मंत्री श्री. लोणीकर म्हणाले, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एक महिन्याच्या आत प्रयत्न केले जातील. पाणीपुरवठा योजनांना होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगर पालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक -3 तयार करण्यात आली असून योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत  अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील 29 गावांच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर / दिन / माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचाविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगरविकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही यावेळी श्री. लोणीकर यांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा