पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी; बालकांच्या वजनातील वाढ स्वागतार्ह- विष्णू सवरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रयत्नांमुळे पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असून बालकांच्या वजनामध्ये वाढ दिसून आली, ही बाब स्वागतार्ह आहे. राज्यात या योजनेवर 137 कोटी रुपये खर्च करण्यात येत असून पालघर जिल्ह्यासाठी 20 कोटी रुपये आहेत, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे सांगितले.


पालघर जिल्हा परिषदेमधील भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेबाबत विधानसभा आश्वासन पूर्ततेच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


या योजनेंतर्गत टप्पा-1 नुसार गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आठवड्यातील 6 दिवस चौरस आहार देण्यात येतो. तर टप्पा-2 नुसार अंगणवाड्यांतर्गत 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील शाकाहारी मुलांना प्रतिदिन 2 केळी किंवा 1 उकडलेले अंडे आठवड्यातील 4 दिवस देण्यात येते.


सदर योजनेमुळे बालकांच्या वजनामध्ये 3 ते 3.5 कि.ग्रॅ. पर्यंत वाढ दिसून येते. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे, असेही श्री. सवरा यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे गरोदर माता अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचेशी संपर्क येत असल्यामुळे अंधश्रद्धा, आहार, स्तनपान पोषण या विषयांवर समुपदेशन करण्यात येत आहे. परिणामी संस्थात्मक प्रसुती होत आहे. यात मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सन 2014-15 बालमृत्यू 626 होते तर सन 2017-18 मध्ये 469 बालमृत्यू झाले. त्याचप्रमाणे जुलै 2017 मध्ये अति तीव्र कुपोषित बालके, (सॅम बालक SAM) 655 होती ती जुलै 2018 मध्ये 383 राहिली. याचाच अर्थ या एका वर्षात 272 सॅम बालकांची संख्या कमी करण्यात यश मिळविलेले आहे.


ग्राम बालविकास केंद्र योजनेंतर्गत (V.C.D.C.) पालघर जिल्ह्यासाठी रु.3.39 कोटी निधी देण्यात आला. त्याद्वारे 1 हजार 499 केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये 3 हजार 594 बालके दाखल झालेले आहेत. त्यामध्ये सुधारणा होऊन 1 हजार 418 बालके सर्वसाधारण श्रेणीत दाखल झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देशही श्री. सवरा यांनी दिले.


या बैठकीस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे व ल. गा. ढोके उपस्थित होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालविकास) पालघर राजेंद्र पाटील तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा